Sanjay Gaikwad On Assembly Election Result : बुलढाणा विधानसभा निवडणुकीत शिवसेना (शिंदे) पक्षाचे नेते संजय गायकवाड यांचा अल्पमतांनी विजय झाला. या मतदारसंघात यंदा चुरशीची लढत पाहायला मिळाली. दरम्यान या निसटत्या विजयामुळे सलग दुसर्यांदा आमदार झालेले संजय गायकवाड मात्र नाराज झाले आहेत. निवडणूक निकालावर प्रतिक्रिया देताना त्यांनी माझ्याच पक्षातील नेत्यांनी माझे काम केले नाही, असे म्हणत गंभीर आरोप केले आहेत. तसेच गायकवाड यांनी विरोधी पक्षाकडून निवडणुकीत ६० ते ७० कोटी रुपये खर्च करण्यात आल्याचा दावादेखील केला आहे.
निवडणुकीत कमी फरकाने निवडून आल्याच्या मुद्द्यावर बोलताना संजय गायकवाड म्हणाले की, “लोकांनी पैसा, दारू-मटण यालाच जास्त प्राधान्य दिलं. महाराष्ट्रात एवढी विकास कामे कुठेच झाली नाहीत, जेवढी बुलढाण्यामध्ये झाली. अनेक जण म्हणायचे की सत्तर वर्षात एवढी कामे, असा आमदार पाहीला नाही. पण अचानकपणे मोठा पैशाचा खेळ झाला. विरोधी पक्षाकडून साठ ते सत्तर कोटी रुपये फेकले गेले ज्यामुळे मला निवडणूक जड गेली”.
संजय गायकवाडांचे गंभीर आरोप
संजय गायकवाड यांचा केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव आणि भाजपाचे आमदार संजय कुटे यांच्यावर आरोप करतानाच व्हिडीओ काही दिवसांपूर्वी समोर आला होता. या आरोपांबद्दल विचारले असता संजय गायकवाड म्हणाले की, ते आरोप नाहीत तर ती वस्तुस्थिती आहे. पुढे निवडणूक काळातील घडामोडींवर बोलताना ते म्हणाले की, “बुलढाण्यात शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाकडून रविकांत तुपकर यांचा एबी फॉर्म तयार होता. अचानकपणे आमच्या खासदारांचा मिलिंद नार्वेकरांना फोन जातो, मिलिंद नार्वेकर हे उद्धव ठाकरेंशी बोलतात आणि तो एबी फॉर्म थांबवला जातो. नंतर संजय कुटे हे अनिल परब यांना फोन करतात आणि हे दोघेही सांगतात की उमेदवार बदलून द्या. जयश्री शेळकेंना उमेदवारी दिली तर आम्ही मदत करू. त्यानंतर तो उमेदवार या दोघांच्या सांगण्यावरून दिला गेला”, असेही संजय गायकवाड म्हणाले. ते टीव्ही९ या वृत्तवाहिनीशी बोलत होते.
हेही वाचा>> लाखाच्या फरकाने पराभव, तरीही युगेंद्र पवारांचा मत पडताळणीसाठी अर्ज; म्हणाले, “जर अधिक…
जयश्री शेळके ८४१ मतांनी पराभूत
बुलढाणा विधानसभा मतदारसंघात संजय गायकवाड यांच्याविरोधात शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाच्या जयश्री शेळके यांना उमेदवारी देण्यात आली होती. निवडणुकीत जयश्री शेळके केवळ ८४१ मतांच्या फरकाने पराभूत झाल्या आहेत. दरम्यान विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर संजय गायकवाड यांचा सहकाऱ्यांवर आरोप करणारा व्हिडीओ समोर आला होता. ज्यामध्ये ते पक्षातील तसेच महायुतीतीत काही नेत्यांनी आपल्याविरोधात काम केल्या बद्दल बोलत होते. विधानसभा निवडणुकीत कोणत्याच नेत्याने माझे काम केले नाही. अगदी केंद्रीय मंत्री (प्रतापराव जाधव) आणि भाजपचे आमदार संजय कुटे यांनीही माझं काम केले नाही. काम (प्रचार) तर सोडाच, पण विरोधी पक्षाचे (ठाकरे गटाचे) तिकीट ‘त्यांना’ मिळवून देण्याचे काम केले, असा आरोप त्यांनी केला होता.