संसदेचे पावसाळी अधिवेशन१८ जुलैपासून सुरु होणार आहे. या अधिवेशनाअगोदरच सत्ताधारी आणि विरोधी पक्षामधील राजकारण तापले असल्याचे दिसत आहे. अधिवेशन काळामध्ये संसद परिसरात धरणे, आंदोलन करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. लोकसभा सचिवालयाने याबाबत आदेश जारी केले आहेत. शिवसेना नेते संजय राऊत यांनी या आदेशावर टीका केली आहे.
संजय राऊतांची टीका
यापुढे संसदेत बोलता येणार नाही. काहीच करता येणार नाही. हातपाय बांधून तोंडावर चिकटपट्टी लावून संसदेत जावे लागेल. या देशात आणीबाणीपेक्षा भयंकर परिस्थिती आहे, अशी टीका राऊत यांनी केली आहे. काँग्रेसकडूनही या बंदी निर्णयावर टीका करण्यात आली आहे. काँग्रेस सरचिटणीस जयराम रमेश यांनी राज्यसभेच्या आदेशाची प्रत ट्वीटर शेअर केली आहे. “विशगुरू का लेटेस्ट साल्वो- D(h)arna मना है!” असं कॅपशन रमेश यांनी दिले आहे.
राज्यसभेकडून आदेश जारी
१८ जुलैपासून संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरु होत आहे. या अधिवेशन काळामध्ये संसद सदस्य कोणत्याही प्रकारचे धरणे किंवा उपोषण संसद भवन परिसरात करु शकत नाही तसेच धार्मिक सोहळ्यासाठी संसद भवन परिसराचा वापर करू शकत नाही, असा आदेश राज्यसभेकडून प्रसिद्ध करण्यात आला आहे.
सुप्रिया सुळेंची टीका
केंद्र सरकारने संसदेच्या आवारात आंदोलन, निदर्शने, उपोषण आदी करण्यास बंदी घातली. सनदशीर मार्गाने विरोध दर्शविण्याचा हा लोकशाही प्रक्रियेतील महत्त्वाचा मार्ग अशारीतीने सरकारने बंद केला ही अतिशय दुर्दैवी बाब आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्वीट करत नाराजी व्यक्त केली आहे. तसेच संसदेच्या आवारातच राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा भव्य पुतळा आहे. महात्मा गांधी यांनी सनदशीर मार्गाने सत्याग्रह या आयुधाचा वापर स्वातंत्र्यलढ्यात केला होता. त्यांच्याच पुतळ्यासमोर सनदशीर मार्गाने विरोध प्रकट करण्यास केंद्रसरकारने बंदी घातली हेही दुर्दैवी असल्याचेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.