सक्तवसुली संचालनालयाने अलीकडेच शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी चौथा समन्स बजावला आहे. तसेच काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनादेखील चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं. केंद्रीय तपास यंत्रणांकडून केल्या जाणाऱ्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर राऊत यांनी केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. केंद्रीय तपास यंत्रणांवर राजकीय दबाव असून संविधानाच्या रक्षणासाठी आपल्याला मोठा लढा द्यावा लागेल, असं विधान राऊत यांनी केलं आहे. ते शुक्रवारी सकाळी पत्रकारांशी संवाद साधत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नॅशनल हेराल्ड गैरव्यवहारप्रकरणी सोनिया गांधी यांना चौकशीला बोलावल्याबाबत विचारलं असता, संजय राऊत म्हणाले, “केंद्रीय तपास यंत्रणा कुणाच्या दबावाखाली काम करत आहेत? हे आपल्या सर्वांना माहीत आहे. आता हे कुणापासूनही लपून राहिलेली गोष्ट नाहीये. विरोधीपक्षातील कोणताही नेता देशाच्या हिताबाबत प्रश्न विचारतो किंवा रस्त्यावर उतरतो, त्या सर्वांचा आवाज दाबण्यासाठी तपास यंत्रणांचा वापर केला जात आहे. मग त्यात सोनिया गांधी असो, राहुल गांधी असो वा संजय राऊत असो, जो प्रश्न विचारतो, त्याला चौकशीसाठी बोलावलं जातं. दहशत निर्माण केली जाते. तुरुंगात पाठवलं जातं. पण आम्ही सर्व प्रकारच्या परिस्थितीसाठी तयार आहोत.”

हेही वाचा- Devendra Fadnavis Birthday: भाजपा आमदाराने फडणवीसांची प्रभू रामचंद्रांशी केली तुलना; म्हणाले, “मी माझ्या श्रीरामाच्या…”

“केंद्रीय तपास यंत्रणांवर राजकीय दबाव आहे. जे सरकारच्या विरोधात उभे आहेत, जे महाराष्ट्रात महाराष्ट्रासाठी लढत आहेत, त्यांच्यावर दबाव आणण्यासाठी अशाप्रकारे तपास यंत्रणांचा वापर सुरू आहे. त्यामुळे मला असं वाटतं की, संविधानाच्या सत्य आणि न्यायासाठी आम्हाला मोठा लढा द्यावा लागेल” असंही राऊत म्हणाले.

पाहा व्हिडीओ –

द्रौपदी मूर्मू यांच्या विजयात आमचा खारीचा वाटा- राऊत

दरम्यान राऊत यांनी राष्ट्रपतीपदाची निवडणूक जिंकल्याबाबत द्रौपदी मूर्मू यांचं अभिनंदन केलं आहे. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, “भारत देशाच्या १५ व्या राष्ट्रपती म्हणून द्रौपदी मूर्मू निवडून आल्या याबद्दल सर्वांना आनंद आहे. कारण एक तळागाळातल्या आदिवासी समाजातील महिला राष्ट्रपतीसारख्या सर्वोच्च पदावर विराजमान होताना, हे पाहून आम्हाला आनंद होतोय. त्यांच्या विजयात आमचा खारीचा वाटा आहे, त्याचा आम्हाला अभिमान आहे. द्रौपदी मूर्मू या देशाच्या संविधानाच्या रखवालदार आहेत. घटनात्मक प्रमुख आहे. त्यामुळे या देशात घटनेची पायमल्ली होणार नाही, न्यायाचं राज्य राहिल याची जबाबदारी आता त्यांच्यावर आहे. जेव्हा-जेव्हा घटनेवर हल्ले होतील, जे आज सुरू आहेत. त्या प्रत्येक वेळी देशाचे नागरिक त्यांच्याकडे अपेक्षेनं पाहतील, हे त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे” असंही राऊत यांनी नमूद केलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivsena leader sanjay raut on sanvidhan draupadi murmu ed summons to sonia gandhi rmm
Show comments