Sanjay Shirsat On Uddhav Thackeray : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी मुंबईतील मेळाव्यात बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. उद्धव ठाकरे यांच्या या टीकेला आता शिवसेना शिंदे गटाचे नेते तथा मंत्री संजय शिरसाट यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. ‘उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांच्याकडे हदबलता व्यक्त केली असेल. मात्र, उद्धव ठाकरे यांच्यावरील हदबलतेला फक्त संजय राऊत जबाबदार आहेत. आजही पक्ष वाचवण्यापेक्षा दुसऱ्यांवर टीका करण्यात धन्यता मानतात’, अशी खोचक टीका संजय शिरसाट यांनी केली आहे.
संजय शिरसाट काय म्हणाले?
“उद्धव ठाकरे यांनी कालच्या सभेत शिवसेना प्रमुखांचे विचार सांगायला हवे होते. मात्र, उद्धव ठाकरे हे नेहमीप्रमाणे एकनाथ शिंदे यांच्यावर बोलले. उद्धव ठाकरे कालच्या सभेत देवेंद्र फडणवीस यांच्यावर काहीही बोलले नाहीत. आता उद्धव ठाकरे ज्यांना गद्दार म्हणत होते, त्यांनीच ठाकरे गटाचा पराभव केला. महापालिकेच्या निवडणुकीत विधानसभेच्या निवडणुकीतील पराभवाचा बदला घ्या असं उद्धव ठाकरे म्हणत आहेत. मात्र, महापालिकेच्या निवडणुकीत पुन्हा आम्हीच जिंकू”, असं संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे. ते टिव्ही ९ मराठी या वृत्तवाहीनीशी बोलत होते.
“आता सर्व टोमणे मारून झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी अभ्यास करून एक नवीन टोमणा काढला आहे, ‘रुसू बाई रुसू, गावी जाऊन बसू’. पण तुम्हाला काय करायचं? यामधून जर तुमची प्रतिमा उंचावेल असं वाटत असेल तर असं नाही. उद्धव ठाकरे कोणाला कोणती उपमा देत आहेत? अमित शाह यांच्याबरोबर तुमचेही नमस्कार करतानाचे फोटो आहेत. मग जर ते शेअर केले तुमची काय अवस्था होईल? कार्यकर्त्यांना काय सांगता की महापालिकेच्या निवडणुकीत सूड उगवा. कार्यकर्त्यांनी काम करायचं मग तुम्ही त्या कार्यकर्त्यांना काय दिलं? उद्धव ठाकरेंची अशी धारणा आहे की संपूर्ण महाराष्ट्र हातातून गेला तरी चालेल. पण मुंबई महापालिका हातातून जाऊ नये. आता उद्धव ठाकरे यांचा पक्ष शेवटची घटका मोजत आहे हे या महापालिकेच्या निवडणुकीत दिसून येईल”, असं संजय शिरसाट यांनी म्हटलं.
काही दिवसांपूर्वी बच्चू कडू यांनी म्हटलं होतं की, “शरद पवार आणि उद्धव ठाकरे भाजपाबरोबर जातील.” आता बच्चू कडू यांच्या या विधानावर संजय शिरसाट यांनी म्हटलं की, “उद्धव ठाकरे भाजपाबरोबर जातील पण भाजपाने त्यांना घेत पाहिजे ना? त्यांचे प्रयत्न होते आणि आताही सुरु आहेत. कोणाकोणाच्या माध्यमातून फोन गेले आहेत हे आम्हाला सर्व माहिती आहे. आता काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांची भेट घेतली. मग भेटीत काय चर्चा झाली हे त्यांनी सांगावं. सहज जाऊन भेट घेतली असं नाही तर उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांच्याकडे हदबलता व्यक्त केली असेल. मात्र, उद्धव ठाकरे यांच्यावरील हदबलतेला फक्त संजय राऊत जबाबदार आहेत. आजही त्यांची मानसिकता बदलत नाहीत. ते पक्ष वाचवण्यापेक्षा दुसऱ्यांवर टीका करण्यात धन्यता मानतात”, अशी टीका संजय शिरसाट यांनी केली.