मुंबईमध्ये शनिवारी मध्यरात्री उशीरापर्यंत हाय व्होल्टेज ड्रामा सुरू असताना अमरावतीमध्ये शिवसेनेच्या एका पदाधिकाऱ्यावर गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे राजकीय तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे. योगेश घारड असं त्यांचं नाव असून त्यांनी आपली प्रकृती स्थिर असल्याचा व्हिडीओ संदेश जारी केला आहे. तसेच, आपल्या कार्यकर्त्यांना शांतता राखण्याचं आवाहन देखील केलं आहे.

मुंबईत दिवसभर राजकीय घडामोडी

मुंबईत अटकेत असलेले नवनीत राणा आणि रवी राणा यांना भेटायला गेलेले भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्या गाडीवर जमावानं दगडफेक केली आणि या नाट्याला सुरुवात झाली. या हल्ल्यामध्ये किरीट सोमय्यांच्या गाडीची काच फुटली असून त्यांना हनुवटीला किरकोळ जखम देखील झाली. या पार्श्वभूमीवर एकीकडे राज्यातलं राजकीय वातावरण चांगलंच तापलं असून दुसरीकडे अमरावतीमधील शिवसेना उपजिल्हा प्रमुखावर गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. गोळीबारामध्ये हे पदाधिकारी जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

राणा दाम्पत्याला अटक

अमरावतीमधील आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा या दाम्पत्यानं मातोश्रीसमोर हनुमान चालीसा पठण करण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार शनिवारी दिवसभर राजकीय घडामोडी सुरू होत्या. सकाळपासूनच मातोश्रीबाहेर आणि राणा यांच्या मुंबईतील घराबाहेर शिवसेना कार्यकर्त्यांनी ठिय्या मांडला होता. अखेर राणा दाम्पत्यानं दुपारी आंदोलन संपवत असल्याचं जाहीर केलं. मात्र, यानंतर राणा दाम्पत्याला अटक करण्यात आली. याचा भाजपाकडून जोरदार निषेध केला जात आहे.

“माझा मनसुख हिरेन करण्याचा उद्धव ठाकरेंचा डाव होता”, किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप!

मुंबईत या सर्व घडामोडी घडत असताना अमरावतीमध्ये शनिवारी रात्री उशीरा शिवसेनेचे मोर्शीतील उपजिल्हा प्रमुख योगेश घारड यांच्यावर काही अज्ञातांनी गोळीबार केला. २३ एप्रिल रोजी रात्री १० वाजेदरम्यान वरुडमधील मूलताई परिसरात शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख योगेश घारड यांच्यावर गोळीबार करण्यात आला. यात गोळी लागल्याने घारड जखमी झाले आहेत.

का झाला गोळीबार?

दरम्यान, अंतर्गत वादातून हा गोळीबार झाल्याचं बोललं जात आहे. घारड यांना तातडीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल केल्यानंतर नागपूर खासगी रुग्णालयात हलविण्यात आलं. त्यानंतर योगेश घारड यांनी स्वतः रुग्णालयातून शिवसैनिकांना शांतता राखण्याच आवाहन देखील केलं आहे. याशिवाय आपली प्रकृती स्थिर असल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलं आहे.

“जे कुणी हितचिंतक आहेत त्यांना मी सांगू इच्छितो की मी एकदम सुखरूप आहे. दुकानं बंद करून आपल्याच लोकांना त्रास होईल असं कोणतंही कृत्य करू नका. मी तुम्हाला शांततेचं आवाहन करतोय”, असं घारड यांनी जारी केलेल्या व्हिडीओ संदेशामध्ये म्हटलं आहे.

Story img Loader