गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीदरम्यान प्रभादेवीत शिंदे गट आणि शिवसैनिकांमध्ये बाचाबाची झाली होती. या बाचाबाचीचं रुपांतर हाणामारीत झालं आहे. शनिवारी मध्यरात्री दादरमध्ये शिंदे गट आणि शिवसैनिकांमध्ये तुफान राडा झाला. या प्रकारानंतर शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी दादर पोलीस ठाण्यात पोलिसांसमोरच गोळीबार केल्याचा आरोप शिवसेना नेते सुनील शिंदे यांनी केला आहे. हा गोळीबार झाल्यानंतर पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारीदेखील भयभयीत झाले होते, अशी प्रतिक्रिया सुनील शिंदे यांनी दिली आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

संबंधित प्रकरणावर प्रतिक्रिया देताना सुनील शिंदे म्हणाले की, “इकडचे जे स्थानिक आमदार आहेत, त्यांनी काही पदाधिकाऱ्यांना बंदुकीचा धाक दाखवला. त्यानंतर पोलीस ठाण्यात येऊन पोलीस अधिकाऱ्यांसमोरच गोळीबार केला. तरीही त्यांच्यावर कारवाई होत नाही, हे या महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. मी स्वत: रात्री पोलीस ठाण्यात आलो होतो. मी त्या पोलीस अधिकाऱ्यांची नावं घेत नाही, परंतु घडलेल्या प्रकारानंतर पोलीस अधिकारीसुद्धा काळजीत होते, ते भयभयीत झाले होते, असा प्रकार यापूर्वी आम्ही कधीही बघितला नव्हता.”

हेही वाचा- “ठाकरे गटाचे ५० जण आले अन् मी एकटाच…”  संतोष तेलवणे यांनी सांगितली शिवसेना-शिंदे गटातील राड्याची संपूर्ण घटना

नेमकं काय घडलं?
दहाव्या दिवशी मिरवणुकीदरम्यान प्रभादेवीमध्ये शिंदे गट आणि शिवसेनेचे कार्यकर्ते आमने-सामने आले. दोन्ही बाजूंनी बाचाबाची झाली. त्यात सदा सरवणकर यांचे पुत्र समाधान सरवणकर यांनी ‘म्याँव म्याँव’ म्हणत शिवसेनेवर टीका करणारं भाषण केल्यानंतर वातावरण अधिकच तापलं होतं. पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर हा वाद अधिक न चिघळता मिटला. दुसऱ्या दिवशी म्हणजेच शनिवारी रात्री पुन्हा एकदा हा वाद उफाळून आला. सदा सरवणकर यांनी गोळीबार केल्याचा आरोप शिवसेना आमदार सुनील शिंदे यांनी केला. मात्र, हा कौटुंबिक वाद होता, असं म्हणत सदा सरवणकर यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे.

हेही वाचा- “..तर खरी शिवसेना काय आहे, हे त्यांना कळेल”, प्रभादेवी प्रकरणावरून अरविंद सावंतांचा सत्ताधाऱ्यांना इशारा!

या प्रकरणी आज शिवसेना कार्यकर्त्यांनी दादर पोलीस स्थानकाबाहेर आंदोलन करत शिवसेना गटातील लोकांवरील गुन्हे हटवण्याची आणि शिंदे गटातील कार्यकर्ते-पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली. पोलिसांनी ही मागणी मान्य केली असून शिंदे गटातील संबंधितांवर गुन्हे दाखल केल्याचं अरविंद सावंत यांनी सांगितलं. तसेच, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवर दाखल केलला ३९५चा गुन्हा देखील मागे घेण्याचं आश्वासन पोलिसांनी दिल्याचं ते म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivsena leader sunil shinde reaction on prabhadevi clash gun firing by sada sarvankar rmm
Show comments