उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना केवळ तीनवेळा मंत्रालयात गेले. अन्यवेळी मातोश्रीवर लपून खोके मोजण्याचे काम करत होते. तर, रश्मी ठाकरे या वर्षा बंगल्यावर कंत्राटदारांनी भेटत होत्या, असा गंभीर आरोप शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी केला होता. त्यांनी केलेल्या वक्तव्यानंतर कदमांवर टीकेचा भडीमार केला जात आहे. शिवसेनेच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी सुद्धा रामदास कदमांचा समाचार घेतला आहे.
“बुधवारपासून रामदास कदमांच्या विरोधात राज्यात शिवसेना आंदोलन करणार आहे. कदम यांनी महाराष्ट्रात फिरून दाखवावे. ज्या मराठवाड्यात कदम यांनी संपर्कप्रमुख म्हणून काम केलं. तेथील लातूर, बीड जिल्ह्यात येऊन दाखवावे,” असे आव्हान सुषमा अंधारे यांनी दिलं आहे. त्या प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या.
हेही वाचा – मुख्यमंत्री अशोक गेलहोत काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढू शकतात, पण…
“कदमांकडे एवढी ताकद आणि निष्ठेची भाषा कोठून आली”
“रामदास कदमांवर उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे अथवा रश्मी ठाकरे बोलत नाहीत. परंतु, शिवसेनेतील कोणाही तुमच्या नितीवर, ध्येयधोरणावर, कामाच्या पद्धतीवर बोलेल. पण, कुटुंबावर किंवा वैयक्तिक गोष्टींवर कोणी बोलणार नाही. तरीही तुम्ही वैयक्तिक पातळीवर घसरता. सरड्यापेक्षा वेगात रंग बदलता तुम्ही. कदमांकडे एवढी ताकद आणि निष्ठेची भाषा कोठून आली. कुठे या चिल्लर चिल्लर माणसांकडे लक्ष द्यायचे,” असा टोलाही सुषमा अंधारे यांनी रामदास कदम यांना लगावला आहे.