‘डंके की चोट’साठी परिचीत असणारे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी वादग्रस्त विधान केलं आहे. सदावर्ते यांनी बौद्ध भिख्खू संघाची तुलना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी ( आरएसएस ) केली आहे. यावरून त्यांच्यावर विविध स्तरातून टीका करण्यात येत आहे. हाच धागा पकडत शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी सदावर्तेंना ‘अर्धंवटराव’ म्हणत टोला लगावला आहे.

सुषमा अंधारे म्हणाल्या की, “गुणरत्न सदावर्ते हे कायम असंबंध आणि अतार्किक बोलण्यासाठी कुप्रसिद्ध आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भिख्खू संघ यांची तुलना होऊ शकत नाही. भिख्खू संघ अहिंसा मानणारा आहे. परदेशातील पाहुण्यांना महात्मा गांधी यांची समाधी अथवा चैत्यभूमी अथवा दीक्षाभूमी दाखवतात. स्वामी विवेकानंद यांच्या समाधीस्थळावर घेऊन जातात. परंतु, कधीही आरएसएसचे मुख्यालय दाखवण्यात येत नाही. त्यावरून आरएसएस आणि भिख्खू संघात फरक काय आहे, हे सदावर्तेंसारख्या अर्धवटरावांना कळायची गरज आहे.”

हेही वाचा – “शिवसेना का फुटली याचं उत्तर…”, शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांचं मोठं विधान!

“आरएसएसचे पूर्णवेळ कार्यकर्ते असल्याच्या”

“यासारखी तुलना करून सदावर्तेंसारखी माणसं लोकांना चिथावणी देत, दोन समाजातं तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. तुम्ही वकील, राजकारणी आहे हे ठरवा. आरएसएसचे पूर्णवेळ कार्यकर्ते असल्याच्या थाटात वावरणं बंद करा,” अशा शब्दांत सुषमा अंधारे यांनी सदावर्तेंना खडसावलं आहे.

काय म्हणाले गुणरत्न सदावर्ते?

“जगात आरएसएस आणि भिख्खू संघ हे दोनच जागतिक विचार आहे. आरएसएस देशाच्या हितासाठी काम करत आहे. मी भारतीय संविधानासोबत आहे. हे दोन्ही विचार कधीच कोणासोबत हिंसा करणार नाही,” असं गुणरत्न सदावर्ते यांनी औरंगाबादमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हटलं.