बुधवारी शिवसेना आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचा मेळावा पार पडला. मात्र, शिंदे गटाच्या मेळाव्याला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र जयदेव ठाकरे आणि स्मिता ठाकरे या उपस्थित राहिल्याने राजकीय वर्तुंळात खळबळ उडाली. यावरून आता शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंच्या आतेबहिण किर्ती फाटक यांनी हे चित्र दुर्दैवी असून, जयदेव ठाकरे आणि स्मिता ठाकरेंनी बाळासाहेबांना नेहमी मनस्तापच दिल्याचा आरोप केला.
किर्ती फाटक या ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीशी बोलत होत्या. “२००९ साली स्मिता ठाकरे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार होत्या. त्यांनी सोनिया गांधी आणि राहुल गांधींचे खूप गोडवे गायले होते. बाळासाहेब ठाकरे हयात असताना काँग्रेसचं गोडवे गाणाऱ्या स्मिता ठाकरेंना स्टेजवर बोलवणं हा दुटप्पीपणा आहे,” अशी टीका किर्ती फाटक यांनी शिंदे गटावर केली.
हेही वाचा – ठाकरे की शिंदे, कोणाचा दसरा मेळावा पाहिला?; अमित ठाकरे म्हणाले…
“हीच तुमची बाळासाहेबांबद्दलची भक्ती का?”
“जयदेव ठाकरेंनी बाळासाहेबांबत माध्यमांत बोलताना आक्षेपार्ह वक्तव्य केली होती. ज्या बाळासाहेंना एकनाथ शिंदे दैवतासमान मानतात, त्यांचा विचार घेऊन पुढे चाललो, अशी वल्गना करतात. त्या जयदेव ठाकरेंचा सत्कार करताय तुम्ही, याचा अर्थ काय घ्यायचा?, हीच तुमची बाळासाहेबांबद्दलची भक्ती का?,” असा सवालही किर्ती फाटक यांनी एकनाथ शिंदेंना विचारला आहे.
“राज ठाकरेंना जयजयकाराची आणि…”
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबद्दलही किर्ती फाटक यांनी भाष्य केलं आहे. “राज ठाकरेंनी शिवसेना सोडली आणि स्वत:चा पक्ष स्थापन केला. तेव्हा बाळासाहेबांनी सांगितलं होतं, त्याला जयजयकार आणि उदोउदो करायची चटक लागली आहे. त्यामुळे त्याने स्वत:चा पक्ष स्थापन करुन बाहेर पडला,” असे किर्ती फाटक यांनी म्हटलं.