बारामती लोकसभा मतदारसंघाची राज्यात नव्हे तर देशात चर्चा सुरू आहे. खासदार सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार अशी नणंद-भावजय लढत होण्याची शक्यता आहे. खासदार सुप्रिया सुळे या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून तर उमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून मैदानात उतरणार असल्याची चर्चा आहे. याबाबत हालचालीही सुरु आहेत. नणंद-भावजय अशी लढत होण्याची शक्यता असल्यामुळे ही निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटासाठी प्रतिष्ठेची मानली जात आहे. मात्र, या निवडणुकीत नवा ट्विस्ट आला असून शिवसेनेचे नेते विजय शिवतारे हे बारामती लोकसभेची निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.
बारामती लोकसभेची निवडणूक लढवण्यासंदर्भात विजय शिवतारे यांनी इच्छादेखील व्यक्त केली. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटावर त्यांनी जोरदार प्रहारही केला. सध्या राज्यात शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि भाजपा महायुतीचे सरकार आहे. पण शिवसेनेचे विजय शिवतारे यांनी महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या विरोधातच दंड थोपटल्यामुळे युतीत वादाची ठिणगी पडू शकते. त्यामुळे याची तातडीने दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विजय शिवतारे यांना बोलावून घेत त्यांच्याशी चर्चा करत समजूत घातली. मात्र, तरीही विजय शिवतारे ऐकण्याच्या मनस्थितीत असल्याचे दिसत नाही.
हेही वाचा : भारत राष्ट्र समितीच्या नेत्या के. कविता यांना ईडीने घेतले ताब्यात
ताई आणि वहिनी ही लोकशाही नाही
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर आज (१५ मार्च) विजय शिवतारे यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटावर टीका केली. विजय शिवतारे म्हणाले, “ताई आणि वहिनी ही लोकशाही चुकीची आहे. फक्त त्या कोणाच्या पत्नी आहेत, म्हणून त्यांना मते द्यायची हे चूक आहे. आम्ही किती वर्ष पुन्हा-पुन्हा त्यांनाच मतदान करणार आहोत. काय मिळाले आम्हाला? उद्या तुम्ही म्हणताल माझी पत्नी आहे मते द्या, ही माझी मुलगी आहे मते द्या, ही लोकशाहीची थट्टा आहे”, असे विजय शिवतारे म्हणाले.
विजय शिवतारे यांनी अजित पवारांना आव्हान का दिले?
गेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे नेते विजय शिवतारे यांना अजित पवारांनी थेट आव्हान दिले होते. “शिवतारे कसे निवडून येतात तेच पाहतो?”, असे अजित पवार म्हणाले होते. यानंतर विजय शिवतारे यांचा पराभव झाला होता. त्यामुळे विजय शिवतारे यांनी आता ‘टायमिंग’ साधत बारामती लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या हालचाली सुरू केल्या. विजय शिवतारे निवडणुकीच्या रिंगणात उतरले तर बारामती लोकसभा निवडणूक तिरंगी होण्याची शक्यता आहे.