शिवसेना नेते एकनाथ शिंदे बंड पुकारण्याची शक्यता असल्याने राज्यभरातील शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. शिवसैनिक मोठ्या प्रमाणात शिवसेना भवनाबाहेर जमण्यास सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच शिवसैनिकांना जमण्याचे आदेश दिल्याची माहिती असून शक्तीप्रदर्शन केलं जाणार आहे. दुसरीकडे गुजरातमध्ये असलेल्या एकनाथ शिंदेंचं मन वळवण्यासाठी उद्धव ठाकरेंचे विश्वासू सहकारी पोहोचले आहेत. यादरम्यान वर्षा बंगल्यावर आमदार पोहोचल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिसताच शिवसैनिकांनी घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला.
शिवसैनिकांची गर्दी होत असल्याने शिवसेना भवनाबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. शिवसैनिकांकडून यावेळी घोषणाबाजी केली जात असून आपण उद्धव ठाकरेंच्या पाठीशी आहोत असं सांगताना भावूक होत आहेत. तसंच ‘आमच्या सोबत नसलेल्या शिवसेनेच्या आमदारांनी बांगड्या घाला,’ असं आवाहन महिला शिवसैनिक करत आहेत.
एकनाथ शिंदेंचं ट्वीट
“आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत… बाळासाहेबांनी आम्हाला हिंदुत्वाची शिकवण दिली आहे.. बाळासाहेबांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण यांच्याबाबत आम्ही सत्तेसाठी कधीही प्रतारणा केली नाही आणि करणार नाही,” असं एकनाथ शिंदे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
एकनाथ शिंदे गुजरातमध्ये
एकनाथ शिंदे गुजरातमध्ये सूरतमधील एका हॉटेलात आमदारांसोबत आहेत. सूरतमधील या हॉटेलबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. इतर कोणालाही या ठिकाणी प्रवेश दिला जात नाही आहे. पोलीस हॉटेलमध्ये जाणाऱ्या प्रत्येक वाहनाची तपासणी करत आहेत.
सूत्रांनुसार, एकनाथ शिंदे आणि इतर आमदार गुजरात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सी आर पाटील नेत्यांच्या संपर्कात आहेत. गुजरातमध्ये पोहोचल्यानंतर काही आमदारांनी पाटील यांची भेट घेतल्याचंही बोललं जात आहे. दरम्यान पाटील यांनी यावर कोणतंही भाष्य करणं टाळलं असून ‘मी गांधीनगरमध्ये असून काही आमदार सूरतमध्ये आल्याची माहिती मिळाली,’ असल्याचं म्हटलं आहे.