महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी मनसे पदाधिकारी मेळाव्यात केलेल्या भाषणातून चौफेर फटकेबाजी केली आहे. शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावरून सुरू असलेल्या न्यायालयीन लढाईवरही राज ठाकरे यांनी भाष्य केलं आहे. “माझ्या आजोबांचा, बाळासाहेब ठाकरेंचा विचार मला पुढे न्यायचा आहे. माझ्याकडे निशाणी असली काय, नसली काय.. नाव असलं काय, नसलं काय.. याने मला काही फरक पडत नाही. माझ्याकडे सगळ्यात मौल्यवान गोष्ट कुठली असेल, तर ती म्हणजे त्यांचे विचार आहेत. मी त्यांचे विचार पुढे घेऊन जात आहे, असं विधान राज ठाकरे यांनी केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राज ठाकरे यांच्या विधानावरून शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे यांनी सडकून टीका केली आहे. राज ठाकरे हे भाजपाची तळी उचलण्याचं काम करत आहेत. भाजपा ज्याप्रकारे स्क्रीप्ट लिहून देते, त्याप्रमाणे राज ठाकरे बोलतात. ईडीच्या नोटीसीनंतर त्यांच्या भूमिकेत कमालीचा बदल झाला आहे, अशी बोचरी टीका अंबादास दानवे यांनी केली आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

हेही वाचा- शिवसेना सोडण्यापूर्वी बाळासाहेब ठाकरेंसोबत झालेली शेवटची भेट; राज ठाकरेंनी सांगितला ‘तो’ प्रसंग, म्हणाले “आजपर्यंत…!”

“मी बाळासाहेब ठाकरेंचे विचार पुढे घेऊन जातोय” या राज ठाकरेंच्या विधानाचा समाचार घेताना अंबादास दानवे म्हणाले की, “राज ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना सोडल्यानंतर त्यांना आपल्या पक्षाचा साधा झेंडाही व्यवस्थित बनवता आला नाही. आधी कोणता झेंडा होता? आता कोणता झेंडा आहे? आधीच्या झेंड्यात किती रंग होते, आता किती आहेत? ईडीची नोटीस येण्याआधीचे राज ठाकरे आणि आताचे राज ठाकरे यामध्ये कमालीचा बदल झाला आहे.”

हेही वाचा- शिंदे-फडणवीसांचे सरकार ही सत्तेसाठीची आर्थिक तडजोड! ; राज ठाकरे यांची टीका

“आताचे राज ठाकरे हे भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते असल्याप्रमाणे भूमिका मांडतात. ज्या शिवसेनाप्रमुखांची शिवसेना त्यांनी सोडली, आता तेच मी बाळासाहेब ठाकरेंचा वारसा चालवतोय, असं भंपक वक्तव्य करतात. खऱ्या अर्थाने ते कधीतरी बोलून महाराष्ट्राचं मनोरंजन करण्याचं काम करतात. ते भारतीय जनता पार्टीची तळी उचलतायत. तळी उचलून पुढे जाण्याचा ते प्रयत्न करत आहेत. भाजपा ज्यापद्धतीने स्क्रीप्ट लिहून देते, त्यापद्धतीनेच ते बोलतात” असा खोचक टोलाही अंबादास दानवे यांनी लगावला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivsena mla ambadas danve on mns chief raj thackeray balasaheb thackeray mns flag bjp script rmm