दसऱ्याच्या निमित्ताने शिवाजी पार्क मैदानात नेमका कोणी मेळावा घ्यायचा, यावरून उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात जोरदार रस्सीखेच सुरू आहे. मुंबई महापालिकेकडून मेळाव्याला परवानगी मिळावी यासाठी शिवसेनेने अर्ज दाखल केला आहे. मात्र, अद्याप शिवसेनेला दसरा मेळाव्यासाठी परवानगी मिळालेली नाही. शिंदे गटाकडून शिवसेनेचा दसरा मेळावा हायजॅक करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप शिवसेना नेत्यांकडून करण्यात येत आहे. यावरुन शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी शिंदे गटाला इशारा दिला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा- “मी असा पहिला मुख्यमंत्री बघतोय जो…”, बच्चू कडूंची एकनाथ शिंदेंवर स्तुतीसुमनं; तर रवी राणांना लगावला टोला!

शिवसेना आग आहे तिच्या नादी लागू नका…

“या देशामध्ये ज्याप्रमाणे शिवसेनेची एक विचार, एक धोरण, एक झेंडा, एक भूमिका आहे. त्याचप्रमाणे दसरऱ्याच्या दिवशी शिवतीर्थावर गेली ५६ वर्ष मेळावा घेऊन गिनीज बूक ऑफ वर्ल्डमध्ये नोंद करणारा शिवसेना हा एकमेव पक्ष आहे. शिवसेना पक्ष हा धगधगता निखारा आहे. अंगारा आहे. कुणीही या शिवसेनेच्या नादाला लागून आपल्या राजकीय भवितव्याची राख रांगोळी करुन घेऊ नये. शिवसेना आग आहे. तिच्या नादाला जो कुणी लागेल त्याची राजकीय राख रांगोळी झाल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे कुणीही असा प्रयत्न करु नये”, असा सल्ला जाधवांनी शिंदे गटाला दिला आहे.

शिवसेनेचा दसरा मेळावा भारतासाठी अभिमानाची गोष्ट

“बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६६ साली शिवसेनेला जन्म दिला. शिवसेना प्रमुखांनी शिवसेनेचा ध्वज भगवाच ठेवला आहे. शिवसेनेनं मराठी माणूस आणि हिंदुत्वाचा विचार यामध्ये कधीही प्रतारणा केली नाही. शिवसेनेची निशाणी धनुष्यबाण आहे. आणि शिवसेना हा अखंड आणि अभेद्य असा भारतातील सगळ्यात जूना एकमेव पक्ष आहे. गेली ५६ वर्ष एकाच मैदानावर एकाच दिवशी शिवसेनेकडून दसरा मेळावा घेतला जातो ही भारतासाठी अभिमानाची गोष्ट” असल्याचेही भास्कर जाधव म्हणाले.

हेही वाचा- “आधी स्वत:च सांभाळा, मग…”; संदीपान भुमरेंच्या ‘त्या’ दाव्यावर अंबादास दानवेंची टीका

शिवसेनेच्या दसरा मेळ्याकडे सगळ्यांच लक्ष
राज्यात शिवसेनेत झालेल्या बंडखोरीनंतर खरी शिवसेना कोणाची यावरुन उद्धव ठाकरे आणि शिंदे गटात संघर्ष सुरू आहे. शिवसेनेतील ४०हून अधिक आमदारांना फोडल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी आता शिवसेना पक्षावरच दावा ठोकला आहे. सर्वोच्च न्यायालयात त्याबाबतचा वाद प्रलंबित आहे. या दाव्याला पुष्टी मिळावी यासाठी दोन्ही गटांकडून सध्या पदाधिकारी तसेच प्रमुख कार्यकर्त्यांची प्रतिज्ञापत्रे गोळा केली जात आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या दसरा मेळाव्याकडे शिवसेना तसेच एकनाथ शिंदे गटाचे लक्ष लागले आहे. शिवाजी पार्क मैदानात गेली अनेक वर्षे न चुकता शिवसेनेचा दसरा मेळावा पार पडतो. मुंबई महापालिकेकडून मेळाव्याला परवानगी मिळावी यासाठी शिवसेनेने अर्ज दाखल केला आहे. मात्र, अद्याप शिवसेनेला दसरा मेळाव्यासाठी परवानगी मिळालेली नाही. त्यामुळे यंदा शिवसेनेचा दसरा मेळावा होणार का याकडे सगळ्यांच लक्ष लागलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivsena mla bhaskar jadhav criticize shinde group on dasra melava dpj