महाराष्ट्रात सध्या राज्यसभा निवडणुकीवरून राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. आपल्या आमदारांची मतं फुटू नयेत, म्हणून प्रत्येक राजकीय पक्ष विशेष काळजी घेत आहे. शिवसेनेनं देखील आपल्या आमदारांना मुंबईत बोलावून घेतलं आहे. तसेच घोडेबाजार टाळण्यासाठी पुढील किमान चार दिवस हे सर्व आमदार मुंबईतील एका हॉटेलमध्ये एकत्र राहणार असल्याचं समजत आहे. अशी एकंदरीत राजकीय स्थिती असताना शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी भारतीय जनता पार्टीवर घणाघात केला आहे.
‘माझं ते माझं आणि तुझं तेही माझंच, ही भाजपाची सवय’ असल्याची भास्कर जाधवांनी म्हटलं आहे. याबाबतचं वृत्त एका मराठी वृत्तवाहिनीने दिलं आहे. गेल्या वीस वर्षात महाराष्ट्रात राज्यसभा निवडणूक बिनविरोध झाली. भाजपाकडे पुरेसं संख्याबळ नसून देखील त्यांनी आपला एक जास्तीचा उमेदवार उभा केला आहे. भाजपाने राज्यसभेची निवडणूक महाराष्ट्रावर लादली आहे, अशी टीकाही त्यांनी केली आहे.
राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडी सरकार घोडेबाजार करणार असल्याची टीका अलीकडेच भाजपाकडून करण्यात आली होती. याला प्रत्युत्तर देताना भास्कर जाधव म्हणाले की, “आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून ही भाजपाची पद्धत आहे. जी कृती आपल्याला करायची असते, त्यासाठी दुसऱ्याकडे बोट दाखवायचं, दुसऱ्यावर आरोप करायचे आणि आपण मात्र नामानिराळे राहायचं, ही भाजपाची पद्धत आहे. महाविकास आघाडीकडे पुरेपुर संख्याबळ असताना ते घोडेबाजार कसा करतील? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
त्यांनी पुढे म्हटलं की, “भाजपाकडे एवढी कमी मतं असताना देखील त्यांनी राज्यसभेच्या निवडणुकीसाठी तिसरा उमेदवार उभा केला आहे. मग ते जर घोडेबाजार करणार नसतील. तर ते काय ईडीचा, आयकर विभागाचा, सीबीआयचा, एनआयएचा बाजार मांडणार आहेत का? केंद्रीय तपास यंत्रणांचा बाजार मांडून आपला उमेदवार निवडून आणणार आहेत का? हे त्यांनी जाहीर केलं पाहिजे,” असंही भास्कर जाधव म्हणाले.