Mahendra Dalvi On Raigad Guardian Minister : गेल्या काही दिवसांपासून महायुती सरकारमध्ये रायगड आणि नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा तिढा सुटलेला नाही. रायगड आणि नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदासाठी शिवसेना (शिंदे) पक्षाचे नेते आग्रही आहेत. मात्र, जेव्हा पालकमंत्री पदाची यादी जाहीर करण्यात आली होती, तेव्हा रायगडचं पालकमंत्री पद राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या नेत्या अदिती तटकरे यांना तर नाशिकचं पालकमंत्री पद भाजपाचे नेते गिरीश महाजन यांच्याकडे देण्यात आलं होतं. मात्र, यानंतर शिवसेनेच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर या दोन्ही जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाच्या निर्णयाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थगिती दिली होती.
तेव्हापासून अद्याप हा पालकमंत्री पदाचा तिढा सुटलेला नाही. आता देशाचे गृहमंत्री अमित शाह हे रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यामुळे अमित शाह यांच्या या दौऱ्यात पालकमंत्री पदाचा तिढा सुटेल अशा चर्चा राजकीय वर्तुळात आहेत. मात्र, असं असतानाच शिवसेना (शिंदे) पक्षाचे आमदार महेंद्र दळवी यांनी मोठा इशारा दिला आहे. आम्हाला न्याय मिळाला नाही तर उठाव करण्याचा इशारा आमदार महेंद्र दळवी यांनी दिला आहे. ते एबीपी माझा या वृत्तवाहीनीशी बोलत होते.
आमदार महेंद्र दळवी काय म्हणाले?
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे उद्या रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यामुळे या दौऱ्यात पालकमंत्री पदाचा तिढा सुटेल का? असा प्रश्न आमदार महेंद्र दळवी यांना विचारण्यात आला होता. यावर बोलताना आमदार दळवी यांनी म्हटलं की, “आम्हाला नक्कीच न्याय मिळेल. अमित शाह हे रायगडच्या दौऱ्यावर येत आहेत, त्यांचा नियोजित कार्यक्रम आहे. तसेच अमित शाह हे खासदार तटकरे यांच्याकडे भोजनाच्या कार्यक्रमासाठी जाणार आहेत. मात्र, बंद दाराआड चर्चा करण्याची काही गरज आहे असं मला वाटत नाही. कारण आम्ही सर्वच रायगडवासीय आशावादी आहोत की भरत गोगावले यांच्या रुपाने आम्हाला पालकमंत्री मिळेल”, असं आमदार महेंद्र दळवी यांनी म्हटलं आहे.
“खरं तर खूप उशीर झाला आहे. पण मला वाटतं की मागच्या परिवर्तनात रायगडचा इतिहास हा सर्वांना ज्ञात आहे. तेव्हा भरत गोगावले हे कदाचित मंत्री झाले असते तर ते पालकमंत्री नक्कीच झाले असते. कारण भरत गोगावले हे चार टर्मचे आमदार आहेत, आता मंत्री आहेत. प्रोटोकॉलनुसार गोगावले यांना पालकमंत्री पद द्यायला पाहिजे. मात्र, सुनील तटकरे यांचा नेहमीप्रमाणे हव्यास असतो. सुनील तटकरे यांचा हव्यास असला तरी रायगडची जनता हे स्वीकारणार नाही”, असं म्हणत आमदार महेंद्र दळवी यांनी खासदार सुनील तटकरे यांच्यावर टीका केली.
“आम्ही सर्वजण आशावादी आहोत की आम्हाला नक्कीच न्याय मिळेल. पण जर असं घडलं नाही तर रायगडची परंपरा आहे की रायगडला जेव्हा जाग येते तेव्हा रायगडमधून उठाव होतो आणि मग परिवर्तन होतं. हे देशाने आणि राज्याने पाहिलेलं आहे. याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून वरिष्ठ नेते याबाबत योग्य तो निर्णय घेतील. त्यामुळे आम्ही वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहोत”, असा इशारा आमदार महेंद्र दळवी यांनी दिला.