रायगड जिल्ह्यात महाविकास आघाडीतील कुरबुरी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. शिवसेनेच्या तिनही आमदारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे रायगडच्या पालकमंत्री बदला अशी मागणी केली आहे. पालकमंत्री आदिती तटकरे मनमानी पद्धतीने काम करत असून शिवसेना आमदारांना विश्वासात घेत नसल्याची तक्रारही त्यांनी केली आहे. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याकडेही त्यांनी आपल्या व्यथा मांडल्या आहेत.
महाआघाडीच्या स्थापनेपासूनच रायगड जिल्ह्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कुरबुरी सुरुच आहेत. आदिती तटकरे यांची पालकमंत्रीपदी निवड झाल्यानंतरही शिवसेना आमदारांनी याबाबत जाहीर नाराजी व्यक्त केली होती. अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबईत दोन्ही पक्षाच्या जिल्ह्यातील नेत्यांची बैठक घेऊन, एकत्रित येऊन काम करण्याचा सल्ला दिला होता. पालकमंत्री आदिती तटकरे यांना जिल्ह्याचा कारभार पाहताना शिवसेना आमदारांना विश्वासात घेण्याच्या सूचना दिल्या होत्या.
त्यानंतर काही दिवस सगळं काही सुरळीत सुरु असल्याचे जाणवत होते. दरम्यान जिल्हा नियोजन समितीतील निधी वाटपावरून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील वादाला पुन्हा एकदा तोंड फुटले. जल जिवन मिशनच्या योजनांवरून दोन्ही पक्षात वादाची ठिणगी पडली. यावर नगर पंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसनी शिवसेनेशी जुळवून घेण्यास नकार दिला. दोन्ही पक्ष एकमेकांविरोधात लढले. राष्ट्रवादीने शेकापशी आघाडी करून त्यांनी माणगाव, पालीची निवडणूक लढवली, तळा नगरपंचायत राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेचा पराभव केला. माणगावमध्ये शिवसेनेनी काँग्रेस आणि भाजपाच्या मदतीने राष्ट्रवादी काँग्रेसला रोखले. यामुळे दोन्ही पक्षातील वाद अधिकच विकोपाला गेले. खासदार सुनील तटकरेंनी शिवसेनेवर जाहीर टिका केली.
त्यामुळे शिवसेनेचे तीनही आमदार आता तटकरेंविरोधात एकवटल्याचे चित्र पहायला मिळत आहे. माणगाव येथील नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर आमदार भरत गोगावले यांनी पत्रकार परिषद घेऊन थेट पालकमंत्री बदलण्याची मागणी केली आहे. यावेळी जिल्हाप्रमुख अनिल नवगणे, आणि माजी जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर, राजीव साबळे उपस्थित होते. त्यामुळे आगामी काळात शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसमधील वाद अधिकच विकोपाला जाण्याची चिन्ह दिसू लागली आहे.
“महाआघाडी सरकारच्या स्थापनेनंतर सर्वसमावेशक कारभार व्हावा अशी आमची अपेक्षा होती. मात्र ही अपेक्षा आता फोल ठरली आहे. पालकमंत्री तटकरे मनमानी पद्धतीने कारभार करत असून शिवसेना आमदारांच्या मतदारसंघात लुडबूड करत आहेत. परस्पर निर्णय घेत आहेत, त्यामुळे आम्ही मुख्यमंत्र्यांकडे रायगडचा पालकमंत्री बदला अशी मागणी करत आहोत,” अशी माहिती आमदार भरत गोगावले यांनी दिली आहे.