“भंडारा-गोंदिया जिल्ह्यांच्या सीमावर्ती भागात निर्वस्त्र आढळलेल्या ३५ वर्षीय विवाहित महिलेवर निर्घृणपणे अत्याचार झालेत. दिल्लीतील निर्भयाप्रमाणेच या पीडितेवरही अत्याचार झालाय,” असं मत शिवसेना आमदार नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केलं. या पीडितेवर पाच शस्त्रक्रिया कराव्या लागणार असल्याचीही माहिती गोऱ्हे यांनी यावेळी दिली. त्या शनिवारी (६ ऑगस्ट) माध्यमांशी बोलत होत्या.
नीलम गोऱ्हे म्हणाल्या, “भंडारा बलात्कारप्रकरणात पीडितेवर मदत करतो म्हणून पुन्हा निर्घृण अत्याचार झाले. शेवटी १ ऑगस्टला पीडिता गोंदिया आणि भंडारा जिल्ह्याच्या सीमावर्ती गावात पूर्णपणे विवस्त्र अवस्थेत सापडली. त्यानंतर गावकऱ्यांनी पीडितेला कपडे देऊन पोलिसांना याची माहिती दिली. मला शुक्रवारी (५ ऑगस्ट) माध्यमांमधून या घटनेची माहिती मिळाली. घटना १ ऑगस्टला समोर आल्यानंतरही ४ ऑगस्टनंतर याबाबत हालचाली झाल्या.”
“या प्रकरणात अद्यापही एक आरोपी सापडलेला नाही”
“मी पोलीस महानिरिक्षकांशी बोलले आहे. पीडितेच्या कुटुंबियांशी बोलले. या प्रकरणात अद्यापही एक आरोपी सापडलेला नाही. पीडितेचं कुटुंब फार गरीब आहे. दिल्लीतील निर्णयाप्रमाणेच ही घटना आहे. तिच्यावर पाच शस्त्रक्रिया कराव्या लागणार आहेत. त्यातील एक शस्त्रक्रिया झालीय. एकदम सर्व शस्त्रक्रिया करता येत नाही. शरीराची प्रतिकारशक्ती वाढवून मग एकामागोमाग शस्त्रक्रिया होणार आहे,” अशी माहिती नीलम गोऱ्हेंनी दिली.
“या प्रकरणात स्थानिक पोलिसांनी लक्ष घातलंय. दोन आरोपींना अटक झालीय. मात्र, मूळ आरोपी अद्यापही पकडला गेलेला नाही,” असंही त्यांनी नमूद केलं.