मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या औरंगाबादमधील सभेच्या पार्श्वभूमीवर शहरात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून जोरदार तयारी सुरू आहे. अशातच शिवसेनेचे आमदार प्रदीप जैस्वाल यांनी शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी घेतलेली औरंगाबादमधील पहिली सभा आणि औरंगाबाद पालिकेत शिवसेनेला मिळालेले मोठे यश याची आठवण सांगितली आहे. ते बुधवारी (१ जून) औरंगाबाद शहरातील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर माध्यमांशी बोलत होते.
औरंगाबादच्या इतिहासामध्ये प्रथमच बाळासाहेब ठाकरे यांनी औरंगाबादमध्ये सभा घेतली होती. त्याच सभेनंतर महानगरपालिकेवर शिवसेनेचे २७ नगरसेवक निवडून आले होते. त्याच विराट मैदानावर आता पुन्हा शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभेचे आयोजन ८ जून रोजी करण्यात आले. या विराट सभेची मोठी तयारी शिवसेनेच्यावतीने करण्यात आली आहे, अशी माहिती शिवसेनेचे आमदार प्रदीप जैस्वाल यांनी दिली.
“शिवसेनेच्या सभेला पैसे देऊन लोक जमा करण्याची गरज नाही”
शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे यांनी भाजपवर नाव न घेता जोरदार टीका केली. “शिवसेनेच्या सभेला पैसे देऊन लोक जमा करण्याची गरज पडत नाही. आमची संघटनात्मक शक्ती खूप मोठी आहे. त्यामुळे आमच्या सभेला मोठा प्रतिसाद मिळतोच. आम्हाला पैसे देऊन लोक जमा करण्याची गरज पडत नाही,” असा टोला अंबादास दानवे यांनी भाजपाचं नाव न घेता लगावला.
हेही वाचा : मुख्यमंत्र्यांच्या औरंगाबाद सभेच्या तयारीसाठी वॉर्डनिहाय व गावनिहाय १५०० बैठका
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ८ जून रोजी औरंगाबाद शहरात सभा होणार आहे. त्या अनुषंगाने शिवसेना मोठ्या प्रमाणात कामाला लागल्याचे चित्र औरंगाबाद शहरात आहे. शिवसेनेचे आमदार, माजी खासदार आणि विविध पदाधिकारी यांच्या माध्यमातून शिवसेनेच्या मोठ्या बैठका औरंगाबाद जिल्ह्यात मराठवाड्यात सुरू आहेत. त्या माध्यमातून ८ जून रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची होणारी सभा मोठी विराट होणार असल्याची घोषणा यावेळी शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे यांनी केली.