Maharashtra Cabinet Expansion : राज्यात विधानसभेची निवडणूक दोन ते तीन महिन्यांमध्ये जाहीर होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्ष तयारीलाही लागले आहेत. राजकीय नेते सध्या मतदारसंघाचा आढावा घेत आहेत. तसेच महाविकास आघाडी आणि महायुतीमधील पक्षांच्या जागावाटपाबाबतही सध्या खलबतं सुरु आहेत. मात्र, विधानसभा निवडणुकीच्या आधी महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचं बोललं जात होतं. मात्र, आता महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. यावर आता शिवसेना शिंदे गटाचे नेते, आमदार संजय शिरसाट यांनी मोठं विधान केलं आहे. “मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नाही तर अनेक आमदार नाराज होतील”, असं वक्तव्य संजय शिरसाट यांनी केलं आहे. त्यांच्या या विधानामुळे चर्चांना उधाण आलं आहे.
संजय शिरसाट काय म्हणाले?
“असं काहीही होणार नाही. आता ही बातमी हायकमांडच्या माध्यमातून आली की कोणत्या माध्यमातून आली हे माहिती नाही. मात्र, मंत्रिमंडळाचा विस्तार हा झाला पाहिजे. अन्यथा अनेक आमदार नाराज होतील. पण मंत्रिमंडळाचा विस्तार करायला काय हरकत आहे? मात्र, मंत्रिमंडळाचा विस्तार होणार नाही असं होणार नाही तर मंत्रिमंडळाचा विस्तार हा होईल”, असं संजय शिरसाट यांनी म्हटलं. ते टिव्ही ९ मराठीशी बोलत होते.
हेही वाचा : अजित पवार परत आले तर पक्षात घेणार का? शरद पवारांचं मोठं विधान; म्हणाले, “घरात सर्वांना जागा, पण…”
अजित पवार गटाबाबत काय म्हणाले?
भारतीय जनता पक्षाने अजित पवारांना महायुतीत घेतल्याबद्दल संघाशी संबंधित असलेल्या विवेक या मराठी साप्ताहिकानेही आक्षेप नोंदविला. यावर बोलताना संजय शिरसाट म्हणाले, “आता ज्याच त्याचं हे मत आहे. ज्यावेळी युती होते, त्यावेळी आमच्या सारख्या व्यक्तींनी त्यावर काही भाष्य करणं योग्य नाही. वरिष्ठांनी घेतलेला निर्णय आम्हाला मान्य करावा लागतो. मग कुणामुळे फायदा झाला आणि कुणामुळे फटका बसला याचं गणित आम्ही मांडत नाही”, असंही संजय शिरसाट म्हणाले.
भाजपात सन्मान होतो
“भारतीय जनता पार्टीमध्ये सामान्य कार्यकर्त्याचाही सन्मान होतो. विधानपरिषदेच्यावेळी सुद्धा ज्यांना न्याय मिळण्याची अपेक्षा होती त्यांना या विधानपरिषदेवर घेण्यात आलं. फक्त पक्ष मोठा असल्यामुळे थोडा वेळ लागतो पण सन्मान केला जातो. मात्र, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने अनेक वर्ष फक्त कार्यकर्त्यांना वापरण्याचं काम केलं. असे अनेक लोक आहेत, जे कडक कपडे घालून राजकारणात आले आणि निवृत्त झाले. पण भाजपात तसं होत नाही. तेथे सामान्य कार्यकर्त्याचाही सन्मान केला जातो”, असं संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहरात अजित पवार गटाला मोठा धक्का बसला. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या शहराध्यक्षांसह शेकडो पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश केला. यावर बोलताना संजय शिरसाट यांनी म्हटलं की, “निवडणुकीच्या तोंडावर अशा घडामोडी घडत असतात. हा तिकडे जाईल तो इकडे येईल, असे प्रकार होत असतात. त्यामुळे हा धक्का म्हणण्याचं काही कारण नाही. शरद पवार गटाचे काही पदाधिकारी देखील अजित पवार गटात येतील. त्यामुळे या निवडणुकीच्या काळात घडणाऱ्या घडामोडी आहेत. त्यामुळे जास्त मनावर घेण्याच कारण नाही”, असं संजय शिरसाट यांनी म्हटलं.