Sanjay Shirsat : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची ९ डिसेंबर रोजी अपहरण करून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली होती. या घटनेनंतर महाराष्ट्रात मोठी खळबळ उडाली. या घटनेवरून सर्वच क्षेत्रातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. विधानसभेच्या सभागृहातही या घटनेवरून विरोधकांनी आवाज उठवला होता. दरम्यान, संतोष देशमुख हत्या प्रकरणात पोलिसांनी आरोपीला अटक केलं. मात्र, अद्यापही एक आरोपी फरार आहे. तसेच खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडसह हत्या प्रकरणातील आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली. मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आल्यानंतर एसआयटीने वाल्मिक कराडला ताब्यात घेतलं असून पुढील तपास सुरु आहे.
सध्या वाल्मिक कराडला न्यायालयाने २२ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी दिलेली आहे. दुसरीकडे संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडचा सहभाग असल्याचा आरोप विरोधक करत आहेत. तसेच वाल्मिक कराड हा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते तथा मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यामुळे धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधकांकडून केली जात आहे. यावरून सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आले आहेत. संतोष देशमुख हत्या प्रकरणात भारतीय जनता पक्षाचे आमदार सुरेश धस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे खासदार बजरंग सोनवणे व आमदार संदीप क्षीरसागर यांनी आवाज उठवला.
तसेच राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यात संतोष देशमुख हत्येच्या घटनेच्या निषेधार्थ निघालेल्या मोर्चात नेत्यांनी आरोप-प्रत्यारोप केल्यामुळे बीड जिल्ह्यातील राजकारण चांगलंच तापलं. त्यामुळे बीड जिल्हा चांगलाच चर्चेत आहे. दरम्यान, बीड जिल्ह्यातील प्रकरणावरून महायुतीत तणाव वाढत असल्याचं मोठं विधान शिवसेना शिंदे गटाचे नेते तथा मंत्री संजय शिरसाट यांनी केलं. ते साम टिव्ही या वृत्तवाहीनीशी बोलत होते.
संजय शिरसाट काय म्हणाले?
“बीड जिल्ह्यातील स्थानिक राजकारण आहे. तेथील राजकारणावर जेवढं बोलावं तेवढं कमी आहे. मात्र, आम्ही स्पष्टपणे सांगितलेलं आहे की ज्या-ज्या पक्षाचे नेते आहेत, त्या पक्षाच्या नेत्यांनी त्या संदर्भात निर्णय घ्यायचा आहे. आता धनंजय मुंडे यांच्याबाबत काय करायचं? ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ठरवायचं आहे, तसेच आमदार सुरेश धस यांच्याबाबत काय करायचं ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठरवायचं. आम्ही त्या संदर्भातील निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत नाहीत. आता ते (मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार) वरिष्ठ नेते आहेत त्यामुळे त्यांनी निर्णय घ्यायचा आहे आणि ते जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल”, असं संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे.
“बीड जिल्ह्यात दररोज जी बॅटिंग सुरु आहे, दररोज एकमेकांच्या विरोधात आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत, त्यामुळे बीड जिल्ह्यात तणाव वाढत आहे आणि हे सत्य आहे. त्यामुळे महायुतीत निश्चित तणाव वाढतोय. पण काय करणार? कारण एक भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत आणि एक राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे आमदार आहेत. मात्र, तणाव वाढतोय, याची जाणीव सर्वांनी ठेवली पाहिजे”, असं मंत्री संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे.