शिवसेना ( शिंदे गट ) आमदार संजय शिरसाट यांनी छत्रपती संभाजीनगर येथे मेळाव्यात बोलताना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्यावर खालच्या पातळीवर टीका केली होती. ‘ती बाई म्हणते सगळेच माझे भाऊ आहेत. सत्तार, भुमरे माझे भाऊ आहेत. पण, तिने काय-काय लफडी केली आहे, हे तिलाच माहीत,’ असं विधान शिरसाट यांनी केलं होतं. त्यांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळातून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रूपाली पाटील यांनी शिरसाट यांच्यावर टीकास्र डागलं आहे.
“संजय शिरसाटांच्या विरोधात आम्ही न्यायालयात तक्रार दाखल करणार आहोत. न्यायालयात न्याय मिळाला नाहीतर आम्ही आम्ही रस्त्यावर उतरू. ही धमकी समजा किंवा इशारा… तसेच, मुंबईत ७२ व्या मजल्यावर कुणालासाठी फ्लॅट घेतला आहे,” असा सवाल रूपाली पाटील यांनी उपस्थित केला आहे.
हेही वाचा : ‘उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत हजर व्हा…’; दिल्ली उच्च न्यायालयाचं समन्स, काय आहे प्रकरण?
याबद्दल विचारलं असता संजय शिरसाट म्हणाले, “कोण रूपाली पाटील? मला माहिती नाही. ना तिला कधी आयुष्यात पाहिलं आहे किंवा तिची माझ्याशी भेट झाली आहे. मुंबईत मी कुठं राहायला हवं, रस्त्यावर…फ्लॅट कसा घेतला याची चौकशी करा. दोन घरे घेतले त्या म्हणतात, तर ते तुमच्या नावावर करून घ्या.. काही महिलांना वाटतं स्वातंत्र्य फक्त दोन-तीन जणींना दिलं आहे. हा स्टंटबाजीचा प्रकार आहे.”
हेही वाचा : “तिने काय-काय लफडी केली…” सुषमा अंधारेबाबत केलेल्या विधानावर शिरसाटांचं स्पष्टीकरण; म्हणाले…
रूपाली पाटील यांनी न्यायालयात जाण्याचा इशारा दिला, यावर विचारलं असता शिरसाटांनी सांगितलं, “असेच चांगली काम करावीत. तुम्ही प्रसिद्धीसाठी कोणत्या स्थराला जात आहात. तुम्हाला तुमची पातळी कळत आहे का? मला ‘संज्या’, ‘घोडा’ म्हटलं, माझ्या बायको, मुलं, आई-वडिल आणि मित्रांना काय वाटलं असेल,” असा सवाल शिरसाट यांनी उपस्थित केला आहे. ते ‘टिव्ही ९ मराठी’शी बोलत होते.