महाराष्ट्रातला एक मोठा पक्ष बुडवायला निघालेल्या संजय राऊत यांची आम्हाला काळजी वाटते आहे. त्यामुळेच आम्ही त्यांना सायलेन्स झोनमध्ये पाठवणार आहोत. संजय राऊत स्वतःच्या प्रकृतीची काळजी घेत नाहीत. पण आम्ही त्यांच्या तब्बेतीची काळजी घेत आहोत. सायलेन्स झोनमध्ये ते असावेत त्यांनी कुठलाही आवाज करू नये अशी आमची भूमिका आहे असंही संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे.
आज संजय राऊत यांनी पुन्हा एकदा खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर टीका केली आहे. निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांना धनुष्यबाण आणि शिवसेना हे नाव दिल्यापासून संजय राऊत हेदेखील चांगलेच आक्रमक झाले आहेत. श्रीकांत शिंदेंनी माझ्या नावाची सुपारी दिल्याचा आरोपही त्यांनी केला होता. तसंच धनुष्यबाण आणि शिवसेना यासाठी दोन हजार कोटींची डील झाल्याचंही त्यांनी म्हटलं होतं. सातत्याने रोज शिंदे गटावर आरोप करणाऱ्या संजय राऊत यांना आता आम्ही सायलेन्स झोनमध्ये पाठवणार आहोत असं संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे.
संजय राऊत यांची आज श्रीकांत शिंदेंवर टीका
“श्रीकांत शिंदे हे हाडाचे डॉक्टर आहेत आणि त्यांनी बरेच वर्ष प्रॅक्टिस केलेली नाही, एवढं मला माहिती आहे. जी माहिती मला मिळाली होती. ती मी पोलिसांनी दिली. श्रीकांत शिंदेंनी एवढं अस्वस्थ होण्याचं कारण नाही. शिंदे गटाकडून माझ्याविरोधात जे मोर्चे निघत आहेत. हे कायद्याचं राज्य असल्याचं लक्षण नाही. एखादा व्यक्ती जर तक्रार करत असेल, तर त्याची चौकशी व्हायला पाहिजे. तक्रार केली म्हणून दहशतवाद होता कामा नये. कायदा तुमच्या घरात नाचायला ठेवला आहे का? एका गुंडाच्या समर्थनासाठी एक पक्ष रस्त्यावर उतरतो आहे, ही महाराष्ट्राची संस्कृती बदलण्याचा प्रयत्न आहे”, असं प्रत्युत्तर संजय राऊत यांनी दिलं.
निवडणूक आयोगाने चुकीच्या पद्धतीने..
“निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह आमच्याकडून अन्याय पद्धतीने काढून घेतलं तरीही आदित्य ठाकरे दोन्ही मतदार संघात जाऊन प्रचार करत आहेत. त्यांच्या सभांना मोठी गर्दी होत आहे, हजारोंच्या संख्येने तरूण जमत आहेत. इथेच शिवसेना कोणाची हा निकाल लागतो. हे निवडणूक आयोगाला दिसलं नाही, त्यांनी समजून घेतलं नाही. शिवसेनाही जनतेत आहे आणि जनता ही ठाकरेंच्या मागे आहे. हे स्पष्ट दिसत आहे”, असेही ते म्हणाले.