कोयना नदीचे पाणी कर्नाटकाला न देता ते राज्यासाठी राखीव ठेवण्यात यावे, अशी मागणी शिवसेनेचे आमदार शंभूराज देसाईंनी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून त्यांनी ही मागणी केली. कोयना धरणामध्ये उपलब्ध असलेला पाणीसाठा कमी असल्याने तो कर्नाटकाला देण्यात येऊ नये, असे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.

कर्नाटकाला आतापर्यंत देण्यात आलेल्या पाण्यापेक्षा अधिक पाणी देण्यात येऊ नये. तसेच अद्याप राज्यात मॉन्सूनच्या आगमनाला महिन्याभराचा कालावधी आहे. त्यामुळे हा पावळ्यापर्यंत पुरेल का नाही याबाबत सर्वांच्या मनात साशंकता आहे. कोयना धरण पाटण तालुक्यात असले तरी या तालुक्यात पाणी टंचाईने तीव्र रूप धारण केल्याचे देसाई यांनी पाठवलेल्या पत्रात नमूद केले आहे. तसेच नदीकाठी वसलेल्या गावांनाही कोयना नदीतून पाणीपुरवठा करण्यात येत असून शेतीसाठीही याच पाण्याचा वापर करण्यात येत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

 

 

कोयना धरणात जून अखेरीस उरणाऱ्या पाण्याची आकडेवारी पाहता पाणीसाठा राखून ठेवण्यासाठी पाठबांजारे विभागाला कसरत करावी लागत आहे. तसेच शेतकऱ्यांना आणि नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागू नये, तसेच राज्यातील पाण्याची गंभीर स्थिती पाहता हे पाणी राज्यासाठी राखीव ठेवण्यात यावे, अशी मागणी देसाई यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.