शिवसेनेचा शिवाजी पार्कमधील दसरा मेळावा अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचा अविभाज्य भाग असलेले सेनेचे मुख्य प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत तुरुंगात असल्याने मेळाव्यातील त्यांची अनुपस्थिती कार्यकर्त्यांना खटकत आहे. दरवर्षी दसरा मेळाव्याला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या शेजारी संजय राऊत बसायचे. यावर्षीही त्यांची खुर्ची व्यासपीठावर असेल, याची खात्री असल्याचे आमदार सुनील राऊत म्हणाले आहेत. संजय राऊत लवकरच तुरुंगातून बाहेर येतील, असा विश्वासही सुनील राऊत यांनी वर्तवला आहे.
पत्रा चाळ जमीन गैरव्यवहार प्रकरणी संजय राऊत सध्या अटकेत आहेत. त्यांच्या न्यायालयीन कोठडीत १० ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे यंदाचा दसरा त्यांना तुरुंगातच घालवावा लागणार आहे. संजय राऊतांची तुरुंगातून लवकरात लवकर सुटका व्हावी, यासाठी त्यांच्या निवासस्थानी झालेल्या पूजेत कुटुंबियांनी प्रार्थना केली. संजय राऊत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांना उद्धव ठाकरे किंवा महाराष्ट्र विसरला नाही, असे सुनील राऊत यांनी ‘एबीपी माझा’ला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. तुरुंगात असतानाही ते केवळ पक्षाचाच विचार करतात, असे राऊत यांनी सांगितले आहे.
“शिवसेनाप्रमुखांची शिवाजी पार्कमधील दसरा मेळाव्याची परंपरा आज उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली सुरू आहे. आम्हाला कोटींच्या जाहिराती किंवा हजारो बसेस भरून कार्यकर्त आणण्याची गरज नाही” असा टोला सुनील राऊत यांनी शिंदे गटाला लगावला आहे. शिवाजी पार्कचे मैदान शिवसैनिकांनी तुडूंब भरले जाईल, असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला आहे.