गेल्या काही दिवसांपासून भारतीय जनता पार्टीच्या महिला नेत्या पंकजा मुंडे नाराज असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. त्यांनी अनेकदा आपण पक्षात नाराज नसल्याचं म्हटलं आहे. पण पुन्हा-पुन्हा त्यांच्या नाराजीचा मुद्दा महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेत येतो. दरम्यान, शिवसेनेचे (ठाकरे गट) आमदार सुनील शिंदे यांनी मोठं विधान केलं आहे. पंकजा मुंडेच्या नाराजीबद्दल बोलताना त्यांनी पंकजा मुंडे यांचं शिवसेनेत स्वागत आहे, असं म्हटलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शिवसेनेचे आमदार सुनील शिंदे गुरुवारी पाथर्डी तालुका दौऱ्यावर आहेत. त्यांनी येथे विविध ठिकाणी शिवसेनेच्या शाखांचं उद्घाटन केलं. दरम्यान, त्यांनी पंकजा मुंडे यांच्या नाराजीबाबत प्रतिक्रिया दिली. पत्रकारांशी बोलताना सुनील शिंदे म्हणाले, “पंकजा मुंडे फार मोठ्या नेत्या आहेत. त्यांचा पक्ष मोठा आहे. त्यामुळे त्यांचं मत आणि त्यांच्या क्रिया-प्रतिक्रियेशी माझा काहीही संबंध नाही. पण पंकजा मुंडे भाजपाच्या फार मोठ्या नेत्या आहेत. त्यांच्यावर अन्याय होतोय, हे आम्हाला दिसतंय. पण त्या आणि त्यांच्या पक्षातील हा अंतर्गत प्रश्न आहे. त्यामध्ये मी काहीही बोलणार नाही. पण त्यांच्या कर्तुत्वाला आम्ही नेहमीच सलाम करत राहू. पंकजा मुंडे यांचं शिवसेना पक्षात स्वागत आहे,” अशी प्रतिक्रिया शिंदे यांनी दिली.

हेही वाचा- “सगळे घाव झेलायला ताई आणि मलाई खायला…”, पंकजा मुंडेंबाबत प्रीतम मुंडेंचं मोठं विधान!

दरम्यान, सुनील शिंदे यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले की, देशातील सर्वोच्च न्यायालय, ईडी आणि सीबीआय यासारख्या स्वायत्त संस्था केंद्र सरकारच्या दबावाखाली काम करत आहेत. देश हुकूमशाही पद्धतीने चालवला जात आहे. देशातील प्रत्येक राज्यातील स्थानिक पक्ष उद्ध्वस्त करून लोकशाही तंत्र मिटवण्याचे कारस्थान भारतीय जनता पार्टी आणि केंद्र सरकार करत आहे.

हेही वाचा- “उर्फीला प्रसिद्ध करण्याची सुपारी…”, चित्रा वाघ यांच्या टीकेवर काँग्रेस महिला नेत्याचा सवाल

“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ५० आमदारांसह केलेले बंड हे बोके आणि खोक्यांसाठी केलेले असून येणाऱ्या काळात महाराष्ट्रातील शिवसैनिकांकडून त्यांना पराभवाचा सामना करावा लागेल. शिवसैनिकांसाठी मातोश्री हे मंदिर आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेच शिवसेनाप्रमुख आणि पक्षप्रमुख आहेत आणि राहतील,” असे प्रतिपादन शिवसेनेचे आमदार सुनील शिंदे यांनी केलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivsena mla sunil shinde on pankaja munde upset and joining to shivsena rno news rmm