राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असलं तरी तिन्ही पक्षातील नेत्यांमध्ये अनेकदा काही मुद्द्यांवरुन मतांतर असल्याचं पहायला मिळतं. सध्या निधी वाटपावरुन महाविकास आघाडीमधील या पक्षाच्या आमदारांमध्ये नाराजी असल्याचं चित्र असून त्याबद्दल जाहीर भाष्य केलं जात आहे. नुकतंच शिवसेनेचे माजी मंत्री, आमदार तानाजी सावंत यांनी जाहीर कार्यक्रमात बोलताना काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसवर उघडपणे नाराजी व्यक्त केली. “आमच्यामुळे हे सत्तेत आले, आमच्या मांडीला मांडी लावून बसले आणि आमची घडी विस्कटायचा प्रयत्न करतात हे आम्ही खपवून घेणार नाही,” असं सांगत त्यांनी आम्ही केवळ आदेशाची वाट पाहतोय असा इशाराही दिला.
सोमवारी सोलापुरात हुतात्मा स्मृतिमंदिरात आयोजित युवासेना मेळाव्यात सावंत बोलत होते. युवा सेनेचे सचिव वरूण सरदेसाई यांच्या उपस्थितीत हा मेळावा झाला. राज्यात महाविकास आघाडी सरकार चालवत असताना गेल्या अडीच वर्षांत शिवसेनेला दुय्यम वागणूक मिळत असून सरकारच्या अर्थसंकल्पातही हेच दिसून आले आहे. जेथे जेथे शिवसेनेची ताकद आहे, तेथे शिवसैनिकांना दडपण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडून होत आहे. जर अशाप्रकारे अन्याय होणार असेल तर शिवसेना पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांनी आघाडीबाबत फेरविचार करायला हवा, असे परखड मत तानाजी सावंत यांनी यावेळी व्यक्त केले.
दोन्ही काँग्रेसकडून सेनेला दुय्यम वागणूक! ; आमदार तानाजी सावंत यांची नाराजी
“२०१९ पासून आजपर्यंत या तानाजी सावंतने पक्षाच्या विरोधात एक भूमिका घेतली किंवा पक्षाच्या विरोधात एक विधान केलेलं दाखवावं, मी आता आमदरकीचा राजीनामा द्यायला तयार आहे,” असं तानाजी सावंत यावेळी म्हणाले.
“कडवा शिवसैनिक ज्याच्या मनगटाच्या ताकदीवरती, त्याने कधी ऊन, वारा, पाऊस किंवा काही साम, दाम मिळते की नाही याचा विचार केला नाही. शिवसेना हा विस्थापितांचा गट आहे. त्याच्या मनगटातील रग ही वेगळीच आहे, ती कुठल्याही पक्षाने आजमावण्याचा प्रयत्न करू नये. भविष्यातही करू नये आणि मागे केला तर त्यांना काय मिळालं हे त्यांनी बघितलेलं आहे,” अशी आठवण यावेळी त्यांनी करुन दिली.
“सरकारच्या अर्थसंकल्पातदेखील शिवसेनेला दुय्यम-तिय्यम स्थान मिळते. अर्थसंकल्पात ६०-६५ टक्के निधी राष्ट्रवादीला ,तर ३०-३५ टक्के निधी काँग्रेसला मिळतो. फक्त १६ टक्के एवढाच निधी शिवसेनेला मिळतो. त्यातही उच्च व तंत्रशिक्षण खाते शिवसेनेकडे असल्यामुळे दहा टक्के निधी वेतनातच खर्च होतो. केवळ ६ टक्केच निधी विकास कामांसाठी शिवसेनेच्या वाटय़ाला येतो. राष्ट्रवादीचा सामान्य ग्रामपंचायतीचा सदस्यदेखील सरकारकडून एकेक कोटीचा निधी आणतो आणि आमच्या छातीवर बसून नाचतो, आम्ही शिवसैनिकांनी शिवभोजन थाळीवरच समाधान मानायचे. त्यातही पुन्हा बिले मिळण्यासाठी सहा सहा महिने वाट पाहायची,” अशा शब्दांत सावंत यांनी खदखद जाहीरपणे प्रकट केली.
“आमच्यामुळे हे सत्तेत आले, आमच्या मांडीला मांडी लावून बसले आणि आमची घडी विस्कटायचा तुम्ही प्रयत्न करत आहात हे आम्ही खपवून घेणार नाही. आम्ही केवळ आदेशाची वाट पाहतोय. आम्ही सहन करणार, जोपर्यंत आमच्या जीवात जीव आहे, जोपर्यंत रक्ताचा थेंब आमच्या शरिरात आहे तोपर्यंत आम्ही वाट बघू. आमच्या संयमाची तुम्ही अजिबात परीक्षा पाहू नका. जोपर्यंत आदेश येत नाही तोपर्यंत आम्ही शांत आहोत.” असा इशारा तानाजी सावंत यांनी यावेळी दिला.
“आज आमचा निधी, आम्हाला जे अधिकारी हवेत ते मिळत नाहीत. आम्हाला त्यांच्याकडे बघावं लागतं आणि ते गालातल्या गालात हसत आमच्या सर्व आमदारांची चेष्टा करतात. प्रचंड नाराजी आमची या दोन पक्षांवरती आहे हे मी जाहीरपणे सांगतो. ही सत्ता तुम्ही स्वप्नात तरी बघितली होती का? केवळ आमच्या पक्षप्रमुखांच्या आदेशामुळे त्यांच्या निर्णयामुळे तुम्हाला आज सत्तेचं तोंड पाहायला मिळत आहे, त्याची फळं चाखालयला मिळत आहेत. ज्यांनी तुम्हाला सत्तेत बसवलं त्याच पक्षावरती तुम्ही एवढा अन्याय करतात, आम्ही का सहन करायचं?” असंही तानाजी सावंत म्हणाले.