काँग्रेस व राष्ट्रवादीने मराठा समाजाला आरक्षणासाठी खेळवत ठेवले. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संवैधानिक पद्धतीने १६ टक्के आरक्षण दिले. या समाजाला मुख्यमंत्र्यांनीच खरा न्याय दिला असल्याचे शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांनी म्हटले आहे.

सकल मराठा समाजाच्या वतीने आयोजित मराठा आरक्षण संघर्ष सन्मान सोहळय़ासाठी तानाजी सावंत हे लातूरमध्ये आले होते. छावा संघटनेचे केंद्रीय कार्याध्यक्ष नानासाहेब जावळे, विजय घाडगे, भगवान माकणे आदी उपस्थित होते. छावा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अण्णासाहेब जावळे यांनी मराठा आरक्षणाची मागणी लावून धरली होती. त्यांच्या पश्चात त्यांचे स्वप्न पूर्ण होत आहे. मराठा समाजाच्या अनेक संघटना असल्या तरी त्यांची विचारधारा एकच आहे. फडणवीस यांनी मराठा आरक्षणासाठी आयोगाची मंजुरी घेऊन ठराव मंजूर केला व त्यानंतर आदेश काढला. इतर समाजाला न दुखवता त्यांनी स्वतंत्र आरक्षण दिले असल्याचे ते म्हणाले.

आरक्षणाच्या आंदोलनात कार्यकर्त्यांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यासाठी मुख्यमंत्री सकारात्मक आहेत. निवडणुकीच्या निमित्ताने काही मंडळी उजनीतून २७ टीएमसी पाणी आणू, असे मराठवाडय़ाच्या लोकांना आश्वासन देतील. मात्र, जोपर्यंत कृष्णा, भीमा स्थिरीकरण योजनेचे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत उजनीतून पाणी दिले जाऊ शकत नाही. शेतकऱ्यांना ठिबकसाठी शंभर टक्के अनुदान देण्याची गरजही सावंत यांनी व्यक्त केली.

Story img Loader