कोकणात राणे कुटुंब विरुद्ध नाईक कुटुंब यांच्यातला वाद सर्वश्रुत आहे. नारायण राणेंसोबतच निलेश आणि नितेश राणे यांनीही सातत्याने ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांच्यावर टीका केली आहे. त्यावर नाईक यांच्याकडूनही वेळोवेळी पलटवार करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून वैभव नाईक यांच्यावर राणेंकडून करण्यात आलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना आज वैभव नाईक यांनी निलेश राणेंना जाहीर आव्हान दिलं आहे. तसेच, नारायण राणेंचा उल्लेख करत त्यांनाही मी पराभवाची धूळ चारली आहे, असं वैभव नाईक म्हणाले.
प्रसारमाध्यमांशी बोलताना वैभव नाईक यांनी राणे कुटुंबावर सडकून टीका केली. वैभव नाईक हे शिंदे सरकारचे मिंधे असून त्यांच्यावर टीका करत नाहीत, असं निलेश राणे म्हणाले होते. त्यासंदर्भात विचारणा करताच वैभव नाईक यांनी खोचक टोला लगावला. “निलेश राणेंना हे माहिती नाही की त्यांनी आणि त्यांच्या वडिलांनी दबावाखाली येऊ किती पक्ष बदलले. काँग्रेसचं सरकार होतं तर तिथे गेले, शिवसेनेचं सरकार होतं तेव्हा शिवसेनेत होते. आज भाजपाचं सरकार आहे तर भाजपामध्ये आहेत. उद्या दुसरं सरकार येईल, तेव्हा तिकडे जाणार. आम्ही मात्र कुणाचेही मिंधे नाहीत”, असं वैभव नाईक म्हणाले.
“लोक ठरवतील कुणाला आस्मान दाखवायचं आणि..”
“ते म्हणत असतात याने पळ काढला, त्याने पळ काढला. माझं त्यांना जाहीर आव्हान आहे. त्यांनी निवडणुकीत लोकशाहीच्या मार्गाने उभं राहावं. कुणाला आस्मान दाखवायचं आणि कुणाला लोळवायचं हे लोक ठरवतील. पण मला हे माहिती आहे की नितेश किंवा निलेश राणेंमध्ये माझ्यासमोर निवडणुकीत उभं राहाण्याची हिंमत नाही. लोकशाहीच्या मार्गाने लोकप्रतिनिधींनी लोकांच्या समोर गेलं पाहिजे. आज निलेश राणे सातत्याने याचे हातपाय तोडून, त्याला लोळवू, याला लोळवू असं म्हणत असतात. पण मी किंवा भास्कर जाधव लोकांमधून निवडून आलो आहोत”, असंही वैभव नाईक म्हणाले.
जयदत्त क्षीरसागर यांची ठाकरे गटातून हकालपट्टी? बीडचे जिल्हाध्यक्ष म्हणतात, “त्यांचा शिवसेनेशी…!”
“भाजपा तुम्हाला तिकीट देणार नाही”
दरम्यान, भाजपा निलेश राणेंना निवडणूक लढण्यासाठी तिकीट देणार नाही, याची खात्री असल्याचं वैभव नाईक म्हणाले. “माझं निलेश राणेंना आव्हान आहे, की तुमच्यात हिंमत असेल, तुम्ही खरंच राणे असाल, तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत माझ्यासमोर उभे राहा. मला खात्री आहे की भाजपा तुम्हाला तिकीट देणार नाही. माझ्यासमोर तुमची निवडणुकीत उभं राहण्याची हिंमत होणार नाही. त्यांच्या वडिलांनाही मी एकदा धूळ चारलेली आहे. येणाऱ्या काळातही मतदार माझ्या पाठिशी असतील असा मला विश्वास आहे. लोकशाहीत मतदार जो निर्णय घेतील, तो मला मान्य असेल”, अशा शब्दांत वैभव नाईक यांनी निलेश राणेंना डिवचण्याचा प्रयत्न केला.