वेगळ्या विदर्भासंदर्भात राज्याचे महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनी केलेल्या वक्तव्याचे पडसाद अपेक्षेप्रमाणे सोमवारी विधीमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी उमटले. राज्यात भाजपसोबत सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेने वेगळ्या विदर्भाला पुन्हा एकदा कडाडून विरोध केला. शिवसेनेच्या आमदारांनी विधीमंडळाबाहेर तीव्र निदर्शने केली. यावेळी अखंड महाराष्ट्राच्या घोषणाही देण्यात आल्या. दरम्यान, विदर्भातील भाजपच्या काही आमदारांनी शिवसेनेच्या निदर्शनांना प्रत्युत्तर दिले. त्यांनी वेगळ्या विदर्भाच्या बाजूने घोषणा दिल्या.
स्वतंत्र राज्य झाल्याशिवाय विदर्भाचा विकास अशक्य असल्याचे प्रतिपादन राज्याचे महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनी रविवारी ‘लोकसत्ता’शी बोलताना केले. राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येलाच स्वतंत्र विदर्भाची मागणी महाधिवक्ता पदावरील व्यक्तीने केल्याने खळबळ उडाली होती. शिवसेना नेते आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी रविवारी रात्री उशिरा मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन राज्याच्या महाधिवक्त्यांची नेमकी भूमिका काय, याचे स्पष्टीकरण घ्यावे, अशी मागणी केली. मुख्यमंत्री फडणवीस हे अखंड महाराष्ट्राचे असून महाधिवक्त्यांनीही ते भान ठेवले पाहिजे, असे खासदार संजय राऊत यांनी सांगितले.
अणे यांचे भाषण रद्द
सोमवारी उभय सभागृहांतील सदस्यांपुढे अणे यांचे विशेषाधिकार आणि हक्कभंग या विषयावर व्याख्यान होणार होते. मात्र ते रद्द करण्यात आल्याची माहिती विधिमंडळ सचिवांनी रविवारी रात्री उशिरा दिली.

Story img Loader