गेल्या काही दिवसांपासून राज्यात विधानपरिषद निवडणुकीसाठीच्या उमेदवारांवरून जोरदार राजकारण रंगल्याचं पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर सामनातील अग्रलेखातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर खोचक शब्दांत टोला लगावण्यात आला आहे. यासोबतच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना थेट पांडुरंगाच्या चरणी साकडं घालण्याचीही विनंती करण्यात आली आहे. त्यामुळे आता यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकीय सुंदोपसुंदी रंगण्याची चिन्ह दिसू लागली आहेत.
‘राज्यात खोके सरकार आल्यापासून…’
‘महाराष्ट्रात मिंधे-फडणवीसांचे खोके सरकार आल्यापासून जादूटोणा, करणी, टाचण्या, लिंबू-मिरची वगैरे अंधश्रद्धांना उभारी मिळताना दिसत आहे व सध्या याच विषयांची चर्चा मंत्रालयात व इतर सरकारी कार्यालयांत होत असते. मुख्यमंत्री शिंदे व त्यांच्या गटाचे चाळीस आमदार हे गुवाहाटीत कामाख्या देवीच्या मंदिरात गेले. तेथे त्यांनी जादूटोण्याचे विधी केले, रेडा बळी दिल्याचे बोलले जाते. हे बळी म्हणे मुख्यमंत्रीपदाच्या स्थैर्यासाठी दिले. पुन्हा हे लोक त्याच मंदिरात नवस फेडण्यासाठी जाऊन आले’, असं अग्रलेखात म्हटलं आहे. ‘शिंद्यांचे जादूटोणा सरकार सत्तेवर आल्यापासून राजकीय विरोधकांचे अपघात व घातपाताचे प्रमाण अचानक वाढू लागले आहे. याचा संबंध लोक सरकारपुरस्कृत जादूटोण्याशी जोडत असतील तर ते बरे नाही’, असा टोलाही लगावण्यात आला आहे.
‘काल पुणे शहरातील एका कार्यक्रमादरम्यान दीपप्रज्वलनाच्या वेळी खासदार सुप्रिया सुळे यांच्या साडीने पेट घेतला. विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे एका विचित्र लिफ्ट अपघातातून बालबाल बचावले. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात हे नागपूर अधिवेशनाच्या वेळी अपघातात जखमी झाले व त्यांचा उजवा खांदा निखळल्याने ते आजही सक्रिय नाहीत. विरोधकांचा बुलंद आवाज धनंजय मुंडे यांना त्यांच्याच बीड जिल्हय़ात मोठा अपघात झाला. शिवसेनेचे संजय राऊत यांनाही नाहक तुरुंगात जावे लागले. विनायक मेटे यांनाही अपघाती मरण आले’, असे काही संदर्भही या अग्रलेखात नमूद करण्यात आले आहेत.
‘उपमुख्यमंत्र्यांनी पांडुरंगास साकडं घालावं’
‘जादूटोणा, लिंबू-मिरची, टाचण्या, काळय़ा बाहुल्या, रेडा बळी ही काही महाराष्ट्र राज्याची ओळख असता कामा नये. तशी ती होताना दिसत आहे. महाराष्ट्रात राजकीय विरोधकांचे जे अपघात होत आहेत यामुळे त्या अघोरी विषयांच्या चर्चांना हवा मिळाली आहे. विरोधकांच्या जीवितांचे रक्षण व्हावे यासाठी निदान उपमुख्यमंत्र्यांनी पांडुरंगास साकडे घालावे’, अशी खोचक विनंती यात करण्यात आली आहे.
‘महाविकास आघाडीतील सर्व प्रमुख लोकांवर अपघात, घातपात, चौकश्यांची संकटे एकापाठोपाठ कोसळत आहेत. त्यामागे मुख्यमंत्र्यांचे ‘जादूटोणा’ प्रेम आहे असे लोकांना वाटत असेल तर संत गाडगे महाराज, प्रबोधनकार ठाकरे अशा अंधश्रद्धांविरुद्ध लढणाऱ्या समाजधुरिणांचा तो पराभव ठरेल. नरेंद्र दाभोलकर हे हयातभर या अंधश्रद्धेविरुद्ध लढले व शेवटी त्यांचाही निर्घृण पद्धतीने बळी घेतला गेला. आज महाराष्ट्रात कुठे काही घडले की लोकांच्या मनात येते की, ‘अरे बापरे, हा तर जादूटोण्याचाच प्रकार!’ लोकांचा आत्मविश्वास डळमळीत होत असल्याचे हे लक्षण मानायचे काय?’ असा खोचक सवालही अग्रलेखात उपस्थित करण्यात आला आहे.