केंद्रीय निवडणूक आयोगानं सोमवारी शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ हे नाव दिलं आहे. तर ठाकरे गटाला ‘शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)’ ने नाव दिलं आहे. यावरून आता महाराष्ट्रातील राजकारण तापलं आहे. दरम्यान, ठाकरे गटातील शिवसेनेचे खासदार अनिल देसाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. शिंदे गटाला जे हवं आहे, तेच त्यांना कसं मिळतं? असा सवाल त्यांनी विचारला आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगानं दिलेला निर्णय आम्ही मान्य केला आहे. पण आयोगाच्या निर्णयानंतर सोशल मीडियात बऱ्याच प्रतिक्रिया उमटल्या आहेत. त्यातून आयोगानं प्रबोधन घेणं महत्त्वाचं आहे. लोकशाहीचा कणा असलेल्या नागरिकांचं म्हणणं काय आहे? हे आयोगानं बघितलं पाहिजे. आपण कितीही विद्वान असलो तरी समाज काय म्हणतोय? याकडेही लक्ष देणं गरजेचं आहे. पण एक बाब मात्र उघड आहे. शिंदे गट जे सांगतात, जे आगोदर बोलतात, ते सगळं त्यांच्या बोलण्याप्रमाणे घडत आहे. त्यांना जे हवं आहे, ते सगळं मिळतंय. म्हणजे शिंदे गटाचे विचार आणि त्यांची संशोधक वृत्ती निवडणूक आयोगासारख्या महत्त्वाच्या संस्थांशी एवढी कशी काय जुळते, हे सर्व जनता बघत आहे, अशी प्रतिक्रिया अनिल देसाईंनी दिली आहे. ते ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीशी बोलत होते.

हेही वाचा- “त्यांचे बाळासाहेब कोणते?” शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ हे नाव मिळाल्यानंतर आदित्य ठाकरेंचा टोला!

‘मशाल’ हे निवडणूक चिन्ह मिळाल्याबद्दल समाधानी आहात का? असं विचारलं असता अनिल देसाई म्हणाले, “अर्थात आम्ही जे पर्याय सूचवले होते, त्यातील एक चिन्ह मिळाल्याने आम्ही समाधानी आहोत. पण सर्वोच्च न्यायालयात अनेक महत्त्वाच्या आणि गंभीर स्वरुपाच्या याचिका प्रलंबित आहेत. त्यासंदर्भात अद्याप निर्णय होणं बाकी आहे. असं असताना निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे संविधानात्मक पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे दोन्ही संस्थांनी योग्य पद्धतीने हे प्रकरण हाताळावं अशी आमची इच्छा आहे.

हेही वाचा- “शत्रू अंगावर आला तर त्यांच्यासाठी…” निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या तीन नवीन चिन्हांचा भगत गोगावलेंनी सांगितला अर्थ

शिंदे गटाकडून सादर केलेल्या नवीन चिन्हांवर भाष्य करताना अनिल देसाई म्हणाले, शिंदे गटाकडून जे मागितलं जातं तेच त्यांना मिळतंय. त्यामुळे हे सर्व अगोदरच ठरलेलं आहे की काय? अशी मनात शंका निर्माण होते. ते जे म्हणतील, तेच घडतंय. त्यामुळे या संस्थांचं आणि शिंदे गटाच्या विचारांचं गणित एवढं कसं काय जुळतंय? हा एक चमत्कारीक प्रश्न प्रत्येकाच्या मनात निश्चितच निर्माण होत आहे. त्यांनी काहीही धारण केलं तरी शेवटी खरं ते खरं असतं, अर्थात या सगळ्या गोष्टींना जनता न्याय देईल, असंही देसाई पुढे म्हणाले.