उद्धवजी तुम्ही शिवसेना मोठी केली नाही, शिवसेना कोकणी माणसाने मोठी केली आहे. मातोश्रीवर देखील अनेक खोके गेले आहेत ती अंदरकी बात आहे. ही सभा बाळासाहेब ठाकरे जर बघून म्हणत असतील की, माझा मुलगा शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्यामुळे बिघडला आहे, अशी शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर केली होती. त्यांच्या या वक्तव्याचा शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी मोजक्या शब्दांत समाचार घेतला आहे.
“बाळासाहेब नक्कीच वरून बघत म्हणत असतील, काय गद्दारांना जन्म दिला आहे. रामदास कदम ५२ वर्षे शिवसेनेत असल्याचं सांगत आहेत. त्यातील ३२ वर्षे विविध पदांवरती होते, हे सुद्धा त्यांनी सांगावे. भास्कर जाधव राष्ट्रवादीचे अध्यक्ष होते, तेव्हा पक्षात प्रवेश करण्यासाठी रामदास कदम शरद पवार यांच्या गाडीत फिरत होते. मग तुम्ही कसले निष्ठावंत. दापोली आणि खेडमधील जनतेने तुमचा पराभव केला आहे, याची जनाची नाहीतर मनाची बाळगा. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी १२ वर्षे तुम्हाला विधानपरिषदेवर पाठवले. शिवसेनेचे विरोधी पक्षनेते, सत्तेत असताना गृहराज्यमंत्री, प्रदूषण नियंत्रण महामंडळावर होता,” असे अरविंद सावंत यांनी म्हटलं आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
“भाजपासोबत गेल्यावर सगळे पावन होतात”
“केशवराव भोसले यांच्यासोबत असताना रामदास कदम यांचा गुन्हेगारी अहवाल काढा. जसा देवेंद्र फडणवीस यांनी नारायण राणे काँग्रेसमध्ये असताना विधानसभेत मांडला होता. भाजपासोबत गेल्यावर सगळे पावन होतात, गंगेत बुडाल्यासारखे. देशातील चारही स्तंभांचा गैरवापर सत्ताधारी मंडळी करत आहेत,” असा निशाणा अरविंद सावंत यांनी भाजपावर साधला आहे.