शिवसेनेचं धनुष्यबाण हे अधिकृत चिन्ह निवडणूक आयोगानं तात्पुरत्या स्वरूपात गोठावलं आहे. त्याबरोबर शिवसेना हे नावही उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटाला वापरता येणार नाही आहे. त्यामुळे अंधेरी पोटनिवडणुकीत उद्धव ठाकरे धनुष्यबाण हे चिन्ह वापरण्यात मनाई केली आहे. यावरती आता खासदार अरविंद सावंत यांनी प्रतिक्रिया देत निवडणूक आयोगावर टीका केली आहे.

प्रसारमाध्यमांशी बोलताना अरविंद सावंत म्हणाले, “ईडी, सीबीआयनंतर स्वायंत्त संस्था असलेला निवडणूक आयोगही वेठबिगार झाला आहे. आयोगाकडे कोणतरी तक्रार करत, त्याची माहिती न घेता चार तासात धनुष्यबाण चिन्हाबाबत आदेश दिला जातो. कोणाच्या आदेशानुसार हे सर्व सुरु आहे. देश हुकूमशाहीकडे चालला आहे,” असा इशारा त्यांनी दिली.

पाहा व्हिडीओ –

हेही वाचा – ‘धनुष्यबाण’ चिन्ह गोठवल्यानंतर उज्वल निकम यांची प्रतिक्रिया; म्हणाले, “सर्वोच्च न्यायालयात…”

“लोकशाहीवर विश्वास ठेवणाऱ्या जनतेच्या पाठीत सुरा खुपसण्याचे काम सुरु आहे. महाराष्ट्र सगळं उघड्या डोळ्याने पाहत आहे. जेवढा त्रास देण्याचा प्रयत्न कराल, तेवढी शिवसेना अधिक मजबूत झाल्याशिवाय राहणार नाही,” असेही अरविंद सांवत यांनी म्हटलं.