अनेक राजकीय घडामोडींनंतर अखेर ५ ऑक्टोबर रोजी शिंदे गट आणि शिवसेना अशा दोघांचे दसरा मेळावे मुंबईत पार पडले. अपेक्षेप्रमाणे दोन्ही बाजूंनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यात आले. मात्र, आता दसरा मेळाव्याचं राजकारण मागे पडलं असून शिवसेनेचं निवडणूक चिन्ह असलेलं ‘धनुष्यबाण’ नेमकं कुणाला मिळणार? याचा वाद निवडणूक आयोगासमोर आला आहे. यासंदर्भात दोन्ही बाजूंनी आपापली भूमिका निवडणूक आयोगासमोर मांडली जाणार आहे. निर्वाचित लोकप्रतिनिधींच्या संख्येच्या जोरावर शिंदे गटाकडून चिन्हावर दावा सांगितला जात आहे. तर नोंदणीकृत पक्षासंदर्भातल्या नियमावलीचा आधार घेत शिवसेनेकडून चिन्ह पक्षाकडेच राहील, असा दावा केला जात आहे.
निवडणूक चिन्हासंदर्भातल्या वादावर टीव्ही ९ शी बोलताना शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी निवडणूक आयोगासमोरील सुनावणीबाबत पक्षाची भूमिका स्पष्ट केली. तसेच, त्यांनी यावरून वेगवेगळी विधानं करणाऱ्या शिंदे गटातील नेत्यांवरही टीकास्र सोडलं.
“या गोष्टींची एक प्रक्रिया आहे. आम्ही याबाबतची कागदपत्र सादर केली आहेत. अजून यात खरं-खोटंही बघितलं जाणार आहे. खोट्याच्या विटेवर ते सगळे उभे आहेत. शिवसेना म्हणजे काही आमदार-खासदार नाहीत. त्यांना जे कुणी निवडून देतात, ते लोक म्हणजे शिवसेना आहे. शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते त्यासाठी काम करतात”, असं सावंत म्हणाले.
“पडद्यामागून भाजपाच राजकारण चालवतेय”
या सगळ्या घडामोडींमागे भाजपाच असल्याचा आरोप अरविंद सावंत यांनी केला. “केंद्रातील सत्ताधीश, भाजपा ज्या प्रकारे पडद्यामागून हे सगळं राजकारण चालवतेय, तो प्रकार म्हणजे संविधानावर घाला घालण्याचं काम आहे. राज्यपालांकडूनही हे होत आहे”, असं सावंत यावेळी म्हणाले.
“भ्रम निर्माण केला जात आहे की त्यांच्यासोबतच सगळे आहेत. पण न्याय अस्तित्वात आहे. आम्हाला न्यायाची अपेक्षा आहे. शिवसेनेचे पदाधिकारी, स्थानिक स्वराज्य संस्थांचे सदस्य हे सगळे चिन्हावर निवडणूक लढणारे आहेत. हे आमच्यासोबत आहेत. फक्त आमदार-खासदार म्हणजे पक्ष नाही. कार्यकारिणी म्हणजे काय? शिवसेना नोंदणीकृत पक्ष आहे. त्या नोंदणीकृत पक्षाचे ते अध्यक्ष आहेत. ते निवडले गेले आहेत. त्यांची मुदत संपलेली नाही. त्यांना कुणी निष्काषित केलेलं नाही. तुम्हाला कुणी अधिकार दिले? कोण तुम्ही?”, असा सवाल अरविंद सावंत यांनी शिंदे गटाला केला आहे.
“राष्ट्रीय कार्यकारिणीतच का बोलला नाहीत?”
तुम्ही शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत बोललात का? नाही. सुरत, गुवाहाटी, गोवा अशा बाहेरच्या राज्यांमधून आमच्या राज्यात काय करायचं हे तुम्ही ठरवणार का? सुरत, गुवाहाटीला एवढे पोलीस का देण्यात आले? हाही एक प्रकारचा भ्रष्टाचारच आहे. पळालेल्या लोकांना संरक्षण देऊन त्यांच्या पक्षाच्या राज्यात करण्यात आलेला कारभार अनैतिक, असंवैधानिक आहे”, असंही सावंत यांनी नमूद केलं.
“मोठी राष्ट्रीय कार्यकारिणी आहे. जिल्हा प्रमुख,जिल्हा संपर्क प्रमुख आहेत. १८० लोक आहेत. पक्षाची एक घटना आहे. त्या घटनेनुसार पक्षाला मान्यता दिली आहे. त्यानुसार शिवसेना राज्य पातळीवर नोंदणीकृत मान्यताप्राप्त पक्ष आहे”, असंही सावंत म्हणाले.