यवतमाळमध्ये राज्यातील सत्ताधारी शिवसेना आणि केंद्रामध्ये सत्तेत असणाऱ्या भाजपादरम्यान संघर्ष तापलाय. भाजपा महिला आघाडीने स्थानिक खासदार भावना गवळी या हरवल्या असल्यासंदर्भात यवतमाळ शहर पोलीस स्थानकामध्ये तक्रार दाखल केलीय. मागील वर्षी सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) नोटीस पाठवल्यापासून भावना गवळी जनतेसमोर आलेल्या नाहीत. त्यामुळेच भावना गवळी यांचा शोध घ्यावा अशी मागणी करणारी तक्रार भाजपाच्या महिला कार्यकर्त्यांनी पोलिसांकडे केलीय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भाजपा महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष माया शेरे यांच्या नेतृत्वाखाली भाजपा महिला कार्यकर्त्यांनी यवतमाळ शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केलीय. कालपासूनच विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये शिवसेनेकडून शिवसंपर्क अभियानाला सुरुवात झालीय. याच पार्श्वभूमीवर भाजपाने भावना गवळींविरोधात आक्रमक भूमिका घेतल्याचं चित्र दिसत आहे. शिवसंपर्क अभियानच्या दुसऱ्या दिवशीच यवतमाळ-वाशीम मतदारसंघाच्या शिवसेनेच्या खासदार भावना गवळी हरविल्या आहेत, असं रान भाजपानं उठवलं आहे. ईडीच्या नोटीशीनंतर भावना गवळी मतदारसंघात फिरकल्या नाही त्यामुळेच यवतमाळ शहर पोलीस ठाण्यामध्ये खासदार हरविल्या बाबतची तक्रार भाजपाने दिली आहे.

नक्की वाचा >> आता भावना गवळींच्या ‘त्या’ बॅनरवरुन शिवसेना भाजपा आमने-सामने; बॅनरवर मोदींचाही उल्लेख

मागील सहा महिने झाले तरी खासदार गवळी लोकांत मिसळताना दिसल्या नाही. आपल्या समस्या कुणाकडे मांडाव्यात असा प्रश्न महिला मोर्चाने यावेळी बोलताना उपस्थित केला. “भावनाताई गवळी हरवल्या आहेत. एक तक्रार अर्ज आम्ही दिलाय. त्या घरी गेल्यावर घरी दिसत नाहीत. त्यांचा फोन बंद आहे. आम्ही यासाठी फ्लेक्सही लावलेत वाशिम लोकसभेच्या खासदारांना आम्ही शोधतोय. जनता त्रासलीय, संभ्रमामध्ये आहे जनता,” असं भाजपाचे शहर सरचिटणीस राजू पडगीलवार यांनी म्हटलंय. त्यामुळेच हा त्रास दूर करण्यासाठी भाजपाने खासदार हरवल्याची तक्रार केल्याचं राजू पडगीलवार यांनी म्हटलंय.

तर माया शेरे यांनी, “आज सहा महिने झाले त्या मतदारसंघात दिसत नाहीतय. सर्वसामान्य जनतेला समस्या असतील तर त्यांनी कुठे जायचं? आम्ही मतदार म्हणून खासदारांना शोधण्यासाठी अर्ज केलाय,” असं म्हटलंय.

मनी लाँड्रिंग, विविध संस्थांमधील घोटाळ्यांच्या संबंधित कागदपत्रे तसेच पुरावे भावना गवळी यांच्या एका विरोधकाने ईडीला सुपूर्त केल्यानंतर अनेक ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या. त्यातच गवळी यांचे निकटवर्तीय असणाऱ्या सईद खान यांना २७ सप्टेंबर रोजी अटक करण्यात आली आणि तेव्हापासूनच गवळी या सार्वजनिक जीवनापासून दूर आहेत. खान यांना अटक झाल्यानंतर भावना गवळी यांना ईडीने चार वेळा समन्स पाठवले आहेत. खान यांच्या अटकेच्या दिवसानंतर भावना गवळी मतदारांना भेटल्या नाहीत असं सांगितलं जात आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivsena mp bhavana gawali missing bjp filed a police complaint scsg
Show comments