यवतमाळमध्ये सध्या राज्यात सत्तेत असणाऱ्या शिवसेना आणि विरोधी पक्ष असणाऱ्या भाजपामध्ये चांगलाच संघर्ष तापलाय. भाजपाने लावलेलं बॅनर शिवसैनिकांनी फाडले आहे. या बॅनरवर शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांचा फोटो आणि त्यांना शोधण्यासंदर्भातील मजकूर छापण्यात आलेला. शिवसेनेनं हा बॅनर फाडल्याने आता जिल्ह्यातील राजकीय संघर्ष पुन्हा उफाळून येईल असं म्हटलं जात आहे.
खासदार भावना गवळी यांना दाखवा आणि बक्षीस मिळवा असे बॅनर भाजपाने लावले होते. खासदार भावना गवळी यांना समर्थन देत शिवसैनिकांनी संताप व्यक्त केला. पाच महिन्यापासून खासदार दिसत नसल्याने भाजपाने बॅनर लावले होते. शिवसंवाद यात्रा जिल्ह्यात आली असताना भाजपा आणि सेनेत राजकारण तापल्याचे चित्र आहे.
बॅनरवर नेमका मजकूर काय होता?
कवितेच्या माध्यमातून या बॅनरमधून खोचक पद्धतीने टीका करण्यात आलीय. “आमच्या खासदारताई हरविल्या आहेत… धन्यवाद साहेब आपण सुरु केले शिवसंपर्क अभियान या निमित्ताने का होईना आम्हाला मिळेल खासदारांच्या दर्शनाचा मान… एरव्ही त्यांचे आम्हास झाले दुर्लभ दर्शन कंत्राटदार अन् कारखानदारीत रमले त्यांचे मन… असे अभियान आपण बारामाही ध्याना अडीअडचणी आम्ही मांडायच्या कुणाकडे… समजून घ्या आमची भावना!… युगपुरुष मोदींचे करण्या हात बळकट; आम्ही यांना दिला होता मतरुपी आशीर्वाद खासदार हरविल्या आमच्या कुठे मागायची आम्ही दाद…”, असं या बॅनरवर म्हटलं आहे.
मनी लाँड्रिंग, विविध संस्थांमधील घोटाळ्यांच्या संबंधित कागदपत्रे तसेच पुरावे भावना गवळी यांच्या एका विरोधकाने ईडीला सुपूर्त केल्यानंतर अनेक ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या. त्यातच गवळी यांचे निकटवर्तीय असणाऱ्या सईद खान यांना २७ सप्टेंबर रोजी अटक करण्यात आली आणि तेव्हापासूनच गवळी या सार्वजनिक जीवनापासून दूर आहेत. खान यांना अटक झाल्यानंतर भावना गवळी यांना ईडीने चार वेळा समन्स पाठवले आहेत. खान यांच्या अटकेच्या दिवसानंतर भावना गवळी मतदारांना भेटल्या नाहीत असं सांगितलं जात आहे.