शिवसेना खासदार संजय राऊत मागील काही दिवसांपासून न्यायालयीन कोठडीत आहेत. पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने त्यांना अटक केली आहे. दरम्यान, न्यायालयीन कोठडीत जाण्याआधी संजय राऊतांनी आपल्या आईला भावनिक पत्र लिहिलं आहे. हे पत्र संजय राऊत यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून शेअर करण्यात आलं असून सोशल मीडियात वेगानं व्हायरलं होत आहे.
या पत्रातून संजय राऊतांनी आपल्या आईला भावनिक साद घातली असून मी नक्कीच परत येईन असा विश्वासही दिला आहे. मागील अनेक वर्षांपासून तुला सविस्तर पत्र लिहिलं नव्हतं, पण केंद्र सरकारने हे पत्र लिहिण्याची संधी दिली आहे, असंही संजय राऊत पत्रात म्हणाले आहेत.
शिवसेनेचे व स्वाभिमानाचे बाळकडू मी तुझ्याकडूनच घेतले आहेत, मराठी बाणा तुझ्याकडूनच मी शिकलो आहे. शिवसेना आणि बाळासाहेबांशी बेईमानी करायची नाही, हे तूच आमच्या मनावर कोरलंस. आता त्याच मुल्यांसाठी लढण्याची वेळ आली आहे. त्यात तुझा संजय कमजोर पडला, शरण गेला तर बाहेर काय तोंड दाखवू? मी गुडघे टेकलेले तुलाच मान्य नसते. ईडी, प्राप्तिकर विभागाच्या भयाने बरेच आमदार खासदार शिवसेना सोडून गेले. मला बेईमानांच्या यादीत जायचं नाही. कोणीतरी खंबीरपणे उभं राहायला हवं. माझ्यात ती हिंमत आहे. ती हिंमत तू आणि बाळासाहेबांनीच मला दिली आहे. सगळ्यांना माहीत आहे, माझ्यावर खोटे आरोप लावले आहेत. अनेकांना बंदुकीचा धाक दाखवून माझ्याविरोधात बोगस जबाब नोंदवून घेतले आहेत, असं संजय राऊतांनी आपल्या आईला लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.