शिवसेनेचे खासदार गजानन किर्तीकर यांनी सोमवारी (५ सप्टेंबर) रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सरकारी निवासस्थान वर्षावर भेट घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. यानंतर आता शिवसेनेचा आणखी एक खासदार शिंदे गटात सामील होणार का याच्या चर्चांना उधाण आलं आहे. किर्तीकर गणपती दर्शनासाठी गेल्याचं आणि त्यावेळी शिंदेंशी काही वेळ चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. एबीपी माझाने याबाबत वृत्त दिलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शिवसेनेतील बंडखोरीनंतर एकनाथ शिंदे आणि गजानन किर्तीकर यांच्यातील ही दुसरी भेट आहे. याआधी मुख्यमंत्री शिंदे स्वतः किर्तीकरांच्या घरी जाऊन त्यांना भेटले होते. आता स्वतः किर्तीकर वर्षावर गेल्याने तर्कवितर्क लावले जात आहेत.

दरम्यान, याआधी एकनाथ शिंदे यांनी गजानन किर्तीकर यांची गोरेगाव येथील निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती. शस्त्रक्रियेनंतर किर्तीकर आपल्या निवासस्थानी परतले आहेत. शिंदे यांनी किर्तीकरांच्या तब्येतीची विचारपूस करत राजकीय क्षेत्रात पुन्हा सक्रिय होण्यासाठी शुभेच्छा दिल्या होत्या.

हेही वाचा : “ठाकरे सरकार फक्त म्हणण्यापुरतं; प्रत्यक्षात लाभ मात्र पवारांना…”; शिवसेना खासदार गजानन किर्तीकरांचं मोठं विधान

जुलै महिन्यात किर्तीकर यांच्या पायाच्या पोटरीमध्ये रक्ताची गाठ तयार झाली होती. रहेजा रुग्णालयात त्यांच्यावर छोटीशी शस्त्रक्रिया करण्यात आली होती. यानंतर त्यांना तीन आठवडे पूर्णपणे विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता. शस्त्रक्रियेनंतर किर्तीकर आपल्या घरी आल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी त्यांची भेट घेत तब्येतीची विचारपूस केली. यावेळी शिंदेसोबत आमदार संजय शिरसाट, आमदार डॉ. बालाजी किणीकर तसेच गजानन किर्तीकर यांचे सुपुत्र अमोल किर्तीकर आणि त्यांचे कुटूंबीय उपस्थित होते.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivsena mp gajanan kiritikar meet eknath shinde at varsha during ganeshotsav 2022 pbs