राज्यात ठाकरे सरकार आहे, असं आम्ही म्हणतोय मात्र प्रत्यक्ष लाभ पवार सरकार घेत असल्याचं वक्तव्य शिवसेनेचे खासदार गजानन किर्तीकर यांनी केलंय. दापोली तालुक्यात एका कार्यक्रमात बोलताना किर्तीकर असं म्हणाले आहेत. तसेच एका आमदाराला त्याच्या मतदार संघात विकास कामासाठी शासनाकडून निधी मिळविण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात, असं त्यांनी सांगितलं. रत्नागिरी जिल्हयातील दापोली तालुक्यातील शिर्दे-वडवली,ब्राम्हणवाडी ते कोळबांद्रे रस्त्याच्या डांबरीकरण भूमिपुजन कार्यक्रमात ते बोलत होते.
“राज्यात विकास कामांच्या निधीमध्ये पळवापळ केली जात आहे. ग्रामविकास मंत्रालयाच्या योजनांमधून निधी मिळविण्यासाठी मोठी स्पर्धा पाहायला मिळते. आम्हाला मुंबईमध्ये हा प्रश्न उद्भवत नाही. कारण मुंबईत नागरोत्थान आणि नगरविकासचा निधी मिळतो, तसेच मुख्यमंत्र्यांच्या मागे लागून आम्ही निधी मिळवितो. परंतु विकास कामांच्या निधीमध्ये पळवापळवी केली जात आहे. आम्ही म्हणायचं की आमचं ठाकरे सरकार पण प्रत्यक्ष लाभ मात्र पवार सरकार घेतं,” असं गजानन किर्तीकर म्हणाले. यावेळी त्यांनी कार्यक्रमात उपस्थित राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना टोला लगावला.
निधीवरून देवेंद्र फडणवीसांनी केली होती राष्ट्रवादीवर टीका
अर्थसंकल्पात राष्ट्रवादीकडील खात्यांच्या वाटय़ाला ५७ टक्के तर शिवसेनेच्या वाटय़ाला फक्त १६ टक्के निधी आल्याचं देवेंद्र फडणवीस अधिवेशनात म्हणाले होते. अर्थसंकल्पाच्या एकूण ५ लाख ४८ हजार कोटींच्या आकारमानात आर्थिक तरतूद लक्षात घेतल्यास सर्वाधिक ५७ टक्के तरतूद ही राष्ट्रवादीकडील खात्यांवर करण्यात आली आहे. काँग्रेसकडे असलेल्या खात्यांवर २६ टक्के तर शिवसेनेकडील खात्यांना फक्त १६ टक्के रक्कम मिळणार आहे. अजितदादांनी निम्म्यापेक्षा अधिक पैसा हा राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या खात्यांसाठी ठेवला आहे. शिक्षण व उच्च शिक्षण या अनुक्रमे काँग्रेस आणि शिवसेनेकडे असलेल्या खात्यांची तरतूद मोठी असली तरी यातील सर्व निधी हा वेतनावर खर्च होतो. आर्थिक तरतुदीत काय ही शिवसेनेची अवस्था, असा खोचक सवालही फडणवीस यांनी केला. गेल्या वर्षी आर्थिक वर्षांच्या शेवटच्या दिवशी म्हणजे ३१ मार्चला एकूण अर्थसंकल्पीय तरतुदीपैकी २० टक्के रक्कम एका दिवसात खर्च करण्यात आली होती. कसले हे सरकारचे नियोजन अशी टीकाही फडणवीस यांनी केली होती.