ठाकरे गटात आणखी एक मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेचे ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) खासदार गजानन किर्तीकर यांनी ‘बाळासाहेबांच्या शिवसेनेत’ प्रवेश केला आहे. गेल्या तीन महिन्यांपासून किर्तीकर हे शिंदे गटात प्रवेश करण्याच्या चर्चा होत्या. अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईतील रवींद्र नाट्यमंदिर येथे त्यांनी जाहीर प्रवेश केला आहे. गजानन किर्तीकर यांच्या प्रवेशाने शिंदे गटातील खासदारांची संख्या १३ वर गेली आहे.
मागील काही दिवसांपासून गजानन किर्तीकर शिंदे गटात प्रवेश करण्याच्या चर्चा रंगल्या होता. गोरेगाव येथे ठाकरे गटाच्या मेळाव्यात आणि दसऱ्याला बोलताना काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर युती करून चूक केली, असा सल्ला उद्धव ठाकरेंना दिला होता. त्यातच गजानन किर्तीकर यांनी शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांची भेट घेतली होती. त्यानंतर आज ( ११ नोव्हेंबर ) गजानन किर्तीकर यांनी एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत प्रवेश केला आहे.
हेही वाचा : “आत्ता मला रहस्य कळलं की…”, शिंदे गटाच्या १२ खासदारांना संजय राऊतांचं प्रत्युत्तर
अलिकडेच उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत लोकधिकार समिती महासंघाच्या कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं होतं. या समितीचे गजानन किर्तीकर अध्यक्ष आहेत. पण, या कार्यक्रमाला किर्तीकर हेच अनुपस्थित असल्याने चर्चांना उधाण आलं होतं.