भाजपा, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात लोकसभेच्या काही जागांवरून रस्सीखेच सुरु असल्याचे चित्र आहे. भाजपा आणि शिवसेना शिंदे गटामध्ये नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीवरून चांगलीच धुसफूस वाढली आहे. एकीकडे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांनी शक्तिप्रदर्शन करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. हेमंत गोडसे यांच्या शक्तिप्रदर्शनानंतर भाजपाचे पदाधिकारी थेट मुंबईत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी पोहोचले आहेत.
खासदार हेमंत गोडसे यांनी पुन्हा एकदा उमेदवारी मिळण्यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेत जोरदार शक्तिप्रदर्शन केले. महायुतीत नाशिकची जागा शिवसेना शिंदे गटाकडे आहे. मात्र, नाशिकची जागा शिवसेनेला सोडण्यास आता भाजपाच्या स्थानिक नेत्यांनी विरोध केला आहे. एवढेच नाही तर काहीही झाले तरी नाशिक लोकसभेसाठी भाजपाचा उमेदवार देण्यात यावा, अशी मागणी कार्यकर्त्यांची आहे. त्यामुळे नाशिकच्या जागेवरून महायुतीत मिठाचा खडा पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
भाजपाच्या पदाधिकाऱ्यांची मुंबईत बैठक
नाशिक लोकसभेची जागा भाजपालाच सोडावी, यासाठी भाजपाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. नाशिक शहरातील सर्व नेते, पदाधिकारी आज मुंबईत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. त्यामुळे या बैठकीत पदाधिकारी आपली मागणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर मांडणार आहेत. त्यानंतर उपमुख्यमंत्री फडणवीस पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्याची शक्यता आहे.
हेही वाचा : महाराष्ट्रात भाजपाचे २३ उमेदवार जाहीर, पाच विद्यमान खासदारांचा पत्ता कट, कुणाला मिळालं तिकिट ?
केदा आहेर काय म्हणाले?
“नाशिक लोकसभेची जागा कुठल्याही परिस्थितीत भाजपाला मिळावी, या मतदारसंघात आपल्या विचाराचा खासदार पाहिजे, अशी भावना भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांची आहे. पक्षाची संघटना बूथ पातळीपर्यंत मतबूत झालेली आहे. अनेक वर्षांपासून पक्षाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते या ठिकाणी काम करत आहेत. नाशिक शहरात तीन आमदार आहेत, महापालिकेत सत्ता आहे. देवळाली छावणी परिषदेत सत्ता आहे. त्याबरोबरच त्र्यंबकेश्वर नगरपालिकेत भाजपाची सत्ता आहे. जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतीमध्ये भाजपाची सत्ता आहे. त्यामुळे या संघटनेच्या जीवावर नाशिक मतदारसंघात भाजपाच्या कार्यकर्त्याला संधी मिळायला हवी, अशी भावना कार्यकर्त्यांची आहे. आता अंतिम टप्पा असल्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या जागेची मागणी आम्ही केली आहे”, असे ते म्हणाले.
हेमंत गोडसेंना मुख्यमंत्र्यांनी काय शब्द दिला?
खासदार हेमंत गोडसे यांनी नाशिकमधून पुन्हा उमेदवारी मिळण्यासाठी ठाण्यात मोठे शक्तिप्रदर्शन केले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हेमंत गोडसे यांच्यासह शिवसैनिकांना मार्गदर्शन केले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “खासदार हेमंत गोडसे यांच्या पाठिशी उभे राहा. तुम्ही काही काळजी करु नका. कोणताही अन्याय होणार नाही. सध्या काही मतदारसंघाबाबत चर्चा सुरू आहेत, त्यामध्ये आपल्याला यश मिळेल”, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.