“उद्धव ठाकरे यांच्या गटातील दोन खासदार, १० आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात येणार आहेत”, असा मोठा दावा शिवसेनेचे खासदार कृपाल तुमाने यांनी केला आहे. तसेच निवडणूक आयोगात निर्णय आमच्याच बाजून लागेल हे अपेक्षित होतं आणि सर्वोच्च न्यायालयातही आमच्याच बाजूने निकाल लागेल, असाही दावा कृपाल तुमाने यांनी केला. ते शनिवारी (१८ फेब्रुवारी) एबीपी माझाशी बोलत होते.
खासदार कृपाल तुमाने म्हणाले, “मी दसऱ्याच्या दिवशीच सांगितलं होतं की, ठाकरे गटातील दोन खासदार आणि १० आमदार एकनाथ शिंदेंबरोबर येतील. मात्र, काही कारणांमुळे तो पक्षप्रवेश राहिला. त्यावेळी आमच्याबरोबर १२ खासदार होते. त्यानंतर गजानन किर्तीकर आमच्याबरोबर आले. त्यामुळे आमच्याकडील खासदारांची संख्या १३ झाली.”
“उद्धव ठाकरेंबरोबरचे दोन खासदार, १० आमदार एकनाथ शिंदेंबरोबर येणार”
“आणखी दोन खासदार येणार आहेत. त्यामुळे आमच्या खासदारांची संख्या १५ होईल. याशिवाय १० आमदारही आमच्या शिवसेनेत प्रवेश घेताना लवकरच दिसतील,” असा मोठा दावा कृपाल तुमाने यांनी केला.
“…त्यामुळे एकनाथ शिंदे शिवसेनेचे प्रमुख आहेत”
कृपाल तुमाने म्हणाले, “निवडणूक आयोगाने अधिकृतपणे शिवसेना आम्हाला दिली आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे या पक्षाचे प्रमुख आहेत. त्यांच्या नेतृत्वात आम्ही सर्वजण काम करत आहोत. आम्हाला विश्वास होता की, ज्याच्या बाजूने मोठ्या प्रमाणात आमदार-खासदार जातात त्याच्या बाजूने निकाल येतो. हा निर्णय अपेक्षित होता.”
हेही वाचा : “पाळीव कुत्र्याने भाकरीची टोपली पळवली म्हणून मालक भिकारी होत नाही आणि कुत्रा…”, संजय राऊतांचा हल्लाबोल
“सर्वोच्च न्यायालयातही आम्हीच जिंकू”
“सर्वोच्च न्यायालयातही आम्हीच जिंकू. एकनाथ शिंदेंनी २० जूनला शिवसैनिकांसाठी जे काम केलं त्यात आत्ता आम्ही पूर्णपणे विजयी झालो आहोत. आता आम्ही त्यांच्या नेतृत्वात पुढे जाऊ,” असंही तुमाने यांनी नमूद केलं.