महाराष्ट्रात शिवसेनेच्या ४० आमदारांनी बंडखोरी करत भाजपाशी हातमिळवणी केली आणि महाविकास आघाडीचं ठाकरे सरकार कोसळलं. हे सर्व आमदार महाराष्ट्रातून सूरतला नेमके कसे जमले? याविषयीच्या अनेक कथा आता ऐकवल्या जात असतानाच राजधानी दिल्लीत शिवसेनेच्या काही खासदारांची बैठक झाल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही शिवसेना खासदारांनी भाजपाच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याची मागणी केल्यानंतर या भेटीच्या चर्चेमुळे शिवसेनेत पुन्हा फूट पडणार का? असा प्रश्न देखील उपस्थित केला जात असताना शिवसेना खासदार कृपाल तुमाने यांनी मात्र यावर वेगळी भूमिका मांडली आहे.
शिवसेना खासदार कृपाल तुमाने यांच्या दिल्लीतील घरी शिवसेनेच्या जवळपास १० खासदारांची बैठक झाल्याचा दावा केला जात आहे. यासंदर्भात कृपाल तुमाने यांनी टीव्ही ९ शी बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली आहे. तसेच, आपण उद्धव ठाकरेंशी बोललो असून ते योग्य तो निर्णय घेतील, असं देखील त्यांनी म्हटलं आहे.
खरंच तुमानेंच्या घरी बैठक झाली का?
दिल्लीत शिवसेना खासदारांची बैठक झाली का? यासंदर्भात विचारणा केली असता आपण कालपासून नागपुराच असल्याचं तुमाने म्हणाले आहेत. “मी आत्ता नागपूरलाच आहे. कालही मी नागपूरलाच होतो. मग दिल्लीच्या माझ्या घरी बैठक होईलच कशी?” असा सवाल तुमाणेंनी उपस्थित केला आहे. “कोणते खासदार दिल्लीत आहेत हे मला माहिती नाही. पण आमचे ५ ते ६ खासदार पंढरपूरला गेले आहेत. ते दिल्लीला कसे पोहोचतील?” असा देखील प्रश्न त्यांनी विचारला आहे.
पाहा व्हिडीओ –
दरम्यान, भाजपाच्या उमेदवार द्रौपती मुर्मू यांना राष्ट्रपतीपदासाठी पाठिंबा देण्याची मागणी काही शिवसेना खासदारांनी केल्यासंदर्भात तुमानेंनी उद्धव ठाकरे निर्णय घेतील, असं म्हटलं आहे. “आम्हाला उद्धव ठाकरंनी चार वेळा बैठकीला बोलावलं आहे. त्या प्रत्येक बैठकीत आम्ही आमचे विचार त्यांच्यासमोर ठेवले आहेत. फक्त राहुल शेवाळे आणि गावितांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात उद्धव ठाकरेंनी सांगितलं आहे की खासदारांशी चर्चा करून त्यावर निर्णय घेईन. त्यामुळे ते निर्णय घेतील”, असं तुमाने म्हणाले.
“खासदारांमध्ये चलबिचल नाही”
दरम्यान, शिवसेना खासदारांमध्ये चलबिचल नसल्याचं तुमाने म्हणाले आहेत. “खासदारांमध्ये कोणतीही चलबिचल नाही. भावना गवळींचा विषय वेगळा आहे. मी त्यांच्याशी स्वत: फोनवर बोललो. त्या स्वत: टीव्हीवर येऊन भूमिका मांडणार आहेत”, असं त्यांनी सांगितलं. तसेच, “आम्ही या बंडाच्या बाबतीतील आमची भूमिका उद्धव ठाकरेंकडे मांडली आहे. त्यावर उद्धव ठाकरे योग्य तो निर्णय घेतील”, असं सूचक विधान देखील तुमानेंनी केलं.