“संजय राऊत हा उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेंची चाटुगिरी करणारा माणूस आहे. खरं म्हणजे आज एकनाथ शिंदे यांनी मागील सहा-सात महिन्यांमध्ये जो महाराष्ट्रात अनेक चांगल्या निर्णयांचा, विकासकामांचा धडका लावला. केंद्राची मदत घेऊन या राज्याला विकासाकडे त्यांनी नेलं, की जो विकास मागील अडीच वर्ष ठप्प झाला होता. म्हणून आता या लोकांना हे सहन होत नाही. एकनाथ शिंदे यांचे कतृत्व त्यांना पाहावत नाही. मात्र एकनाथ शिंदे हे त्यांची वागणूक, बोलणं, काम यामुळे मोठे झाले आहेत.” अशी टीका बुलढाण्याचे शिवसेनेचे खासदार प्रतापराव जाधव यांनी केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह हे एकनाथ शिंदे यांना देण्याचा निवडणूक आयोगाने निर्णय दिला आहे. यानंतर राज्यात उद्धव ठाकरे आणि त्यांच्या नेतेमंडळींकडून भाजपा व एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार आरोप सुरू आहेत. यातच आता खासदार संजय राऊत यांनीही आज एक गंभीर आरोप केला आहे. ज्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. शिवाय, यावरून आरोप-प्रत्यारोपही सुरू झाले आहेत. शिवसेना नाव आणि निशाणीसाठी आतापर्यंत रुपये २००० कोटींचा सौदा झाला. असं विधान संजय राऊतांनी केलं आहे. यामुळे राजकीय वातावरण अधिकच तापलेलं आहे.

हेही वाचा – “सध्या संजय राऊत हे नागापेक्षाही…” शहाजीबापू पाटलांचं दोन हजार कोटींच्या सौद्याच्या आरोपावर संजय राऊतांना प्रत्युत्तर!

संजय राऊतांच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना खासदार प्रतापराव जाधवांनी म्हटलं की, “आता बाळासाहेबांचं नाव, शिवसेना पक्ष, शिवसेना पक्षाची अधिकृत निशाणी हे आता एकनाथ शिंदे यांच्याकडे आली आहे. निवडणूक आयोगाने अतिशय अभ्यासपूर्वक दोन्ही बाजूंना समान संधी देऊन, त्यांच्या वकिलांचे दावे ऐकूण, काही बाकी राहीलं असेल तर लिखीत स्वरुपात त्यांच्याकडून मागवून घेऊन. हा निकाल त्या ठिकाणी दिलेला आहे. निकालाच्या प्रतींचे वाचन केल्यास दिसून येईल, की निवडणूक आयोगाने अतिशय चांगल्याप्रकारे हा निर्णय दिला आहे. संजय राऊत निकालाच्या दुपारपर्यंत सांगत होते की आमचा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. मात्र निकाल विरोधात गेला म्हणून न्यायव्यवस्थेवर किंवा निवडणूक आयोगावर आरोप करणे हे सभ्यतेला धरून नाही. संजय राऊतांनी ते अगोदर काय म्हणत होते आणि निकालानंतर काय म्हणाले हे एकदा पाहावं, त्यानी स्वत:च सांगावं कोणतं खरं आहे.”

हेहा वाचा – “तुम्ही आणि संजय राऊत कोर्टात जी याचिका दाखल करणार आहात, त्यात…” किरीट सोमय्यांचं उद्धव ठाकरेंना उद्देशून विधान!

याचबरोबर “संजय राऊतांना जे आरोप केले आहेत ते पूर्वीपासून करत आले आहेत. आदित्य ठाकरे, संजय राऊत ही सगळी लोक आमदारांवर १०० खोक्यांचे आरोप करत आहेत. काल त्यांनी खासदरांवर १०० खोक्यांचे आरोप केले. या संजय राऊतांचं गणित अतिशय कच्च दिसतं. मला वाटतं त्यांना आमच्यावर आरोपच करायचा होता, तर त्यांनी ३०० खोक्यांचा करायचा होता. कारण, सहा आमदारांचं प्रतिनिधत्व एक खासदार करत असतो. हे हास्यास्पद आहे आणि संजय राऊतांना दुसरा कुठलाही धंदा राहिलेला नाही. उद्धव ठाकरेंकडून पैसे देऊनच याला भाटगरी करण्यासाठी, शिवसेनेवर आरोप करण्यासाठी ठेवलेलं आहे.” असंही खासदार जाधव म्हणाले आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivsena mp prataprao jadhav criticizes sanjay raut rno news msr