महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. त्यांच्या या भेटीनंतर मनसे महायुतीत सहभागी होणार असल्याचे बोलले जाते. मनसेने महायुतीसमोर लोकसभेच्या तीन जागांचा प्रस्ताव ठेवल्याची चर्चा आहे. मात्र, या प्रस्तावावर भाजपाच्या नेत्यांनी अद्याप काही प्रतिक्रिया दिलेली नाही. यातच आता शिवसेना शिंदे गटाचे नेते, खासदार राहुल शेवाळे यांनी मनसेच्या महायुतीतील सहभागाबद्दल मोठे विधान केले आहे.
राहुल शेवाळे काय म्हणाले?
“मनसेच्या महायुतीमधील सहभागाबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते आणि लवकरच निर्णय जाहीर करतील. मात्र, याआधीच आम्ही आमची शिवसेनेच्यावतीने भूमिका स्पष्ट केलेली आहे. आम्ही मनसेचे स्वागत करतो. कारण मनसे हा पक्ष शिवसेना पक्षाच्या विचारसरणीचा असून हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना पुढे घेऊन जाणारा पक्ष आहे. हिंदुत्वाचे विचार पुढे घेऊन जाणारा पक्ष आहे. राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही यापूर्वीदेखील काम केलेले आहे. त्यामुळे मनसे महायुतीत आल्यानंतर निश्चित स्वरूपात आमची शक्ती, ताकद वाढेल”, असे राहुल शेवाळे माध्यमांशी बोलताना म्हणाले.
हेही वाचा : डॉ. अमोल कोल्हेंनी आढळराव पाटील यांना वाकून नमस्कार करत घेतले आशीर्वाद, दोन्ही नेते समोरासमोर आले अन्…
राज ठाकरेंचे नेतृत्व मान्य
मनसे पक्ष महायुतीत सहभागी होणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. यासंदर्भात राहुल शेवाळे यांनी मोठा खुलासा केला आहे. “मनसेचे नेतृत्व महायुतीमधील तीनही प्रमुख पक्षाला (भाजपा, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट) मान्य आहे. आम्ही राज ठाकरे यांचे महायुतीमध्ये स्वागत करत आहोत”, असेही राहुल शेवाळे म्हणाले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी महायुतीतील सर्व पक्षांची मदत होईल, असेही ते म्हणाले.
महायुतीसमोर मनसेचा प्रस्ताव काय?
महायुतीसमोर मनसेने काय प्रस्ताव ठेवला? याबाबत मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी काही दिवसांपूर्वी सूचक विधान केले होते. ते म्हणाले होते, “आम्ही तीन जागा मागितल्या होत्या. त्यामुळे तीन जागांवर चर्चा सुरू आहे. मात्र, यासंदर्भात राज ठाकरे आणि महायुतीमध्ये असणारे नेते निर्णय घेतील”, असे बाळा नांदगावकर म्हणाले होते.