शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेना पक्षाला गळती लागली आहे. ३० आमदारांसह बंडखोरी केल्यानंतर बंडखोर आमदारांची संख्या आता ५० वर पोहोचली आहे. यानंतर आता शिवसेनेचे काही खासदारही शिंदे गटात सामील होऊ शकतात, अशी शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. शिवसेनेचे १२ खासदार आमच्या संपर्कात आहेत, असा दावा रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केला होता.
त्याचबरोबर, राष्ट्रपती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेनं भाजपाच्या उमेदवार द्रौपदी मूर्मू यांना पाठिंबा द्यावा, अशी मागणी शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती. अशी एकंदरीत स्थिती असताना शिवसेना खासदार संजय जाधव यांनी आज पंढरपुरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. आषाढी एकादशीनिमित्त आयोजित केलेल्या महापुजेदरम्यान ही भेट झाली आहे. यानंतर संजय जाधव देखील शिंदे गटात सामील होणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
याप्रकरणी परभणीचे शिवसेना जिल्हाप्रमुख विशाल कदम यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. त्यांनी एक व्हिडीओ जारी करत म्हटलं की, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना खासदार संजय जाधव यांची महापुजेदरम्यान झालेली भेट केवळ योगायोग आहे. संजय जाधव हे वारकरी असून मागील २५ ते २६ वर्षांपासून आळंदी ते पंढरपूर पायी वारी करतात. पंढरपुरातील प्रत्येक शासकीय महापुजेला ते हजर असतात मग मुख्यमंत्री कुणीही असो.”
हेही वाचा- “बंडखोरीसाठी ५० कोटी घेतले”; राऊतांच्या आरोपाला अब्दुल सत्तारांनी दिलं प्रत्युत्तर, म्हणाले…
“अगदी विलासराव देशमुख यांच्यापासून अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना देखील संजय जाधव शासकीय महापुजेला हजर होते. आजही याच कारणामुळे ते महापुजेला हजर होते. याचा कुणीही गैरअर्थ काढू नये. खासदार संजय जाधव हे निश्चितच उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत आणि राहतील,” असंही ते म्हणाले.