काही दिवसांपूर्वी ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयाने ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी कथित पत्राचाळ घोटाळ्यात अटक केली होती. जवळपास १०४ दिवस तुरुंगात घालवल्यानंतर न्यायालयाने संजय राऊत यांना जामीन मंजूर केला. संजय राऊतांवरील कारवाई राजकीय सूडबुद्धीतून केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. त्यामुळे त्यांची लवकर सुटका होणार नाही, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती.
मात्र, संजय राऊत १०४ दिवसांत तुरुंगातून बाहेर आले. ईडीने कारवाई केलेल्या इतर कोणत्याही राजकीय नेत्यांच्या तुलनेत संजय राऊत सगळ्यात आधी तुरुंगातून बाहेर आले. त्यामुळे त्यांना तुरुंगातून बाहेर काढण्यात कुणाचा हात होता? याबाबत लोकांमध्ये उत्सुकता आहे. संजय राऊत यांचे ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चांगले संबंध आहेत. त्यामुळे या दोन नेत्यांच्या मदतीमुळेच संजय राऊत तुरुंगातून बाहेर आले असावेत, असं बोललं जात आहे.
हेही वाचा- अध्यक्षपदावरून राष्ट्रवादीत दोन गट पडले? जयंत पाटलांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले…
पण राऊतांना तुरुंगातून कुणी सोडवलं? त्यांच्यासाठी कायदेशीर लढाई कुणी लढली? याबाबत संजय राऊतांनी स्वत: खुलासा केला आहे. ते ‘एबीपी माझा’शी बोलत होते. ईडीची कारवाई आणि तुरुंगातून सुटकेबाबत विचारलं असता संजय राऊत म्हणाले, “आतापर्यंत देशभरात ईडीकडून केलेल्या कारवायांमध्ये फक्त तीन महिन्यांत तुरुंगातून बाहेर आलेला एकमेव माणूस मी आहे. मी निष्कलंकपणे बाहेर आलोय, कोर्टाने माझी अटक बेकायदेशीर असल्याचं सांगितलं.”
हेही वाचा- “आम्ही अपात्र ठरलो तरी…”, सुप्रीम कोर्टाच्या संभाव्य निर्णयाबद्दल अब्दुल सत्तार यांचं मोठं विधान
तुरुंगातून बाहेर काढण्यात कोणत्या नेत्याचा सहभाग होता. यावर भाष्य करताना संजय राऊतांनी तुरुंगातून बाहेर काढण्याचं सर्व श्रेय आपला भाऊ आणि ठाकरे गटाचा आमदार सुनील राऊत यांना दिलं. यावेळी राऊत म्हणाले, “मी साडे तीन महिने तुरुंगात राहिलो, सुनील राऊत मला १०० टक्के तुरुंगातून बाहेर काढणार, याची मला खात्री होती. सुनील बाहेर काय करतोय, याची माहिती मी घेत असे. त्याची मेहनत मी पाहत होतो. जेव्हा मी तुरुंगातून बाहेर आलो, तेव्हा मी उद्धव ठाकरेंना भेटलो. तेव्हा उद्धव ठाकरे म्हणाले, संजय तू सुनीलमुळे बाहेर आलाय. त्यानंतर मी शरद पवारांकडे गेलो, तेव्हा शरद पवारही म्हणाले, तू बाहेर आलास ही सुनील राऊतची मेहनत आहे. हे खरं आहे की, ज्या पद्धतीने सुनील बाहेर कायदेशीर लढाई लढत होता, ती मलाही कधी जमली नसती.”