गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारमधील काही नेत्यांच्या घरी आणि कार्यालयात ईडी आणि सीबीआयने छापेमारी केली आहे. काही नेत्यांना अटक झाली असून ते तुरुंगात देखील आहेत. ईडी किंवा सीबीआयच्या छापेमारीचा त्रास होतो का? असा सवाल विचारला असता संजय राऊत यांनी हटके उत्तर दिलं असून एक घटनाक्रम सांगितला आहे. संजय राऊत यांच्या जवळच्या व्यक्तींच्या घरी धाडी पडल्यानंतर संजय राऊतांनी थेट केंद्रिय गृहमंत्री अमित शाह यांना फोन केला होता.
पुणे येथे आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. नेहमी तुमच्या आणि महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यावरच धाडी पडतात. भाजपाच्या नेत्यांवर धाडी पडत नाही. याचा तुम्हाला त्रास होत नाही का, असा प्रश्न सूत्र संचालकाने संजय राऊत यांना विचारला होता. संबंधित प्रश्नाला उत्तर देताना संजय राऊत म्हणाले की,‘त्रास म्हटलं तर होतो. परंतु, तो करून घ्यायला नको. याचं आम्ही २०२४ नंतर उत्तर देऊ. सगळ्यांचे दिवस येतात. आमचे पण दिवस येतील.’
त्यांनी पुढे म्हटलं की, “ईडीने माझी नसलेली संपत्ती जप्त केली. मी ज्या घरात राहतो ते घर आणि माझी वडिलोपार्जित ४०-४५ गुंठे जमीन आहे. ती जमीन कोणतीही नोटीस न देता जप्त केली. तसेच ते मला रोज अटक करणार असल्याच्या धमक्या देतात. मी त्यांना निरोप दिला. मी बसलोय, कधी अटक करताय?
“ज्यादिवशी माझ्या जवळच्या व्यक्तींच्या घरी धाडी पडल्या, तेव्हा मी रात्री बारा वाजता गृहमंत्री अमित शाहांना फोन केला होता. मी दिल्लीत बसलोय, माझ्यासाठी त्या गरीब लोकांना का त्रास देताय? मला अटक करा. मी फोन करून त्यांना सांगितलं आम्ही घाबरत नाही,” असंही राऊत म्हणाले.