शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची तुलना छत्रपती संभाजी महाराज यांच्याशी करण्यात आल्याबद्दल नाराजी व्यक्त केलीय. पत्रकारांनी या तुलनेसंदर्भात प्रश्न विचारला असता, “छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांची तुलना एखाद्या नेत्याशी करणे हा अपराध आहे,” असं मत व्यक्त केलं. तसेच यावरुनच पुढे बोलताना राऊतांनी शिवसेना भवनासंदर्भातील जुन्या वादाचासंदर्भ देत शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्यावर निशाणा साधलाय.

नक्की वाचा >> शिवसेना-भाजपा एकत्र येणार का?, संजय राऊत राणेंचा संदर्भ देत म्हणाले, “ते…”

कोणी आणि कधी केलेली तुलना?

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना महाराष्ट्र पोलिसांनी मंगळवारी ताब्यात घेतलं. त्यानंतर भाजपा नेते आणि कोकणामधील जन आशिर्वाद यात्रेचे समन्वयक प्रमोद जठार यांनी राणेंची तुलना संभाजी महाराजांशी केली होती. जठार यांनी रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक नारायण राणे कोणत्याही अटक वॉरंटशिवाय संगमेश्वरला पोहोचले असल्याचे म्हटले होते. रत्नागिरी पोलीस अधीक्षकांवर राणेंना अटक करण्यासाठी प्रचंड दबाव आहे आणि त्यांना ५ मिनिटात अटक करण्यास सांगितले आहे, असे जठार यांनी म्हटले होते. त्यानंतर नारायण राणे यांना ताब्यात घेत अटक केली. यावर संभाजी महाराजांनासुद्धा याच संगमेश्वरात अटक झाली होती आणि आणि औरंबगजेबचं सरकार पडलं होतं अशी प्रतिक्रिया प्रमोद जठार यांनी दिली होती.

नक्की वाचा >> राऊतांनी भाजपामध्ये बाहेरुन आलेल्यांची बांगलादेशींशी केली तुलना, म्हणाले…

राऊत काय म्हणाले?

संभाजी महाराजांशी करण्यात आलेल्या तुलनेबद्दल राऊत यांनी मराठा संघटना त्याबद्दल पाहून घेतील असं मत व्यक्त केलं, “आम्ही शिवसेना भवनामध्ये पुतळा थोड्या वेगळ्या पद्धतीने लावला तर मराठा समाजाने आक्षेप घेतला. तर या संघटना याबद्दल पाहतील, मनोहर भिडेंना या असल्या गोष्टी आवडत नाहीत. ते हे बंद करतील,” असं राऊत म्हणाले.

दमानियांचा टोला

राणेंची तुलना संभाजी महाराजांशी केल्याने समाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही जठार यांच्यावर टीका केली होती. दमानिया यांनी ट्विटरवरुन जठार यांच्यावर निशाणा साधला. “नारायण राणेंच्या अटकेवर प्रमोद जठार म्हणाले “छत्रपती संभाजी महाराजांना सुद्धा संगमेश्वरला अटक झाली होती”? कुठे छत्रपती संभाजी महाराज आणि कुठे नारायण राणे…”, असा टोला दमानिया यांनी लगावला आहे. तसेच पुढे बोलताना दमानिया यांनी, “काहीही बोलायचं…. कहा राजा भोज और कहा गांगु तेली,” असं म्हटलं.

नक्की वाचा >> ‘शिवसैनिकांना पडलेला प्रश्न’ म्हणत निलेश राणेंनी साधला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा

आधी बाहेरुन आलेले म्हणत टीका…

पत्रकारांशी संवाद साधताना आधी राऊत यांनी राणेंवर भाजपामध्ये बाहेरुन आलेले नेते असं म्हणत निशाणा साधाला. बाहेरुन आलेल्या लोकांनी शिवसेना भाजपामधील संबंध बिघडवल्याची टीकाही राऊत यांनी केली. यापूर्वी कधीच शिवसेना भाजपाचे कार्यकर्ते आमने सामने आले नव्हते. मात्र बाहेरुन आलेल्यांना दोन पक्षांमध्ये संघर्ष हवा असल्याने अशी वक्तव्य केली जात असल्याचा आरोप राऊत यांनी केली. बाळासाहेब ठाकरे आणि अटलजी, बाळासाहेब आणि अडवाणी यांचे संबंध कसे होते तसेच बाळासाहेब, त्यांचे पुत्र उद्धव ठाकरे यांचे नरेंद्र मोदींसोबत कसे संबंध आहेत हे आम्हाला माहितीय. मात्र ज्यांना हे माहिती नाहीय तेच लोक चिखलफेक करत असल्याचा आरोप राऊतांनी केलाय.

Story img Loader