शिवसेना खासदार संजय राऊत यांना अखेर जामीन मंजूर झाला आहे. पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी संजय राऊतांना ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयाने अटक केली होती. तेव्हापासून ते सीबीआय कोठडीत होते. दरम्यानच्या काळात संजय राऊतांकडून अनेकदा जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात आला होता. मात्र, प्रत्येक वेळी पीएमएलए न्यायालयाकडून राऊतांचा अर्ज फेटाळून लावला होता. अखेर आज न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला आहे.
जामीन मंजूर झाल्यानंतर पावणे सातच्या सुमारास ते ऑर्थर रोड तुरुंगातून बाहेर आले आहेत. शिवसेनेचे शेकडो कार्यकर्त्यांनी तुरुगांबाहेर गर्दी करून संजय राऊतांचं जंगी स्वागत केलं आहे. यावेळी कार्यकर्त्यांनी तुरुंगाबाहेर फटाके फोडले.
तुरुंगाबाहेर आल्यानंतर संजय राऊतांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ‘टीव्ही ९ मराठी’ला प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणाले की, “तुरुंगातून सुटल्याचा आनंद आहे. यामुळे न्यायालयावरील विश्वास वाढला. माझी प्रकृती जरा बरी नाही. मी प्रसारमाध्यमांशी यावर सविस्तर बोलणार आहे” अशी प्रतिक्रिया संजय राऊतांनी दिली आहे.